नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.
मागील आठवड्यात न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठासमोर याचिका का दाखल केली नाही, असा सवाल करत तत्काळ सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. याबाबत आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.
याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे जावे. याप्रकरणी सरन्यायाधीशच निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.