३८००० हून अधिक विद्यार्थ्यांची मातृभाषेत दांडी गुल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा काल निकाल (SSC Result) जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात वाढ झाली असली तरीही या निकालामधून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मातृभाषा असलेल्या मराठी विषयात हजारो विद्यार्थ्यांना भोपळा मिळाला असल्याचे समोर आले आहे. मराठी भाषेतच विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे. मराठीपेक्षा जास्त इंग्रजी विषयाचा निकाल लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मराठी विषयाची पीछेहाट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मराठी विषयाचा निकाल
महाराष्ट्रामध्ये एकूण १० लाख ९४ हजार १५२ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी १० लाख ५५ हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच तब्बल ३८ हजार ४३७ विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत. मुंबई विभागामध्ये मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्यांची संख्या १ लाख ६ हजार २५६ इतकी होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला १ लाख ५ हजार ३२२ जण हजर होते. त्यापैकी १ लाख ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच मुंबई विभागात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ६७० इतकी आहे.
इंग्रजी भाषेचा इतका निकाल
इंग्रजी विषयाचा निकाल ९८.१२ टक्के इतका लागला. ३ लाख ५९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३ लाख ५२ हजार ४९१ जण उत्तीर्ण झाले आहेत. तर ६,७३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठीमध्ये नापास होणाऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.
हिंदीची स्थिती काय?
हिंदी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ११० इतकी आहे. हिंदीचा निकाल ९३.९१ टक्के इतका लागला आहे. ३६ हजार ७२९ विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण झाले असून २ हजार ३८१ विद्यार्थी हिंदीच्या परीक्षेत नापास झाले आहेत.
या विषयांचा निकाल १०० टक्के
दहावीच्या परीक्षेमध्ये एकूण ५८ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २१ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये हेल्थ केअर, शेती, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, प्लंबर जनरल, गुजराती, द्वितीय भाषा उर्दू, हिंदी-फ्रेंच, द्वितीय तसेच तृतीय भाषा हिंदी-कन्नडा, हिंदी-तमीळ, हिंदी-मल्याळम, हिंदी-बंगाली अशा जोड विषयांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शैक्षिणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना देखील हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयात गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.