Tuesday, July 2, 2024
Homeमहत्वाची बातमीCM Eknath Shinde : मान्सून दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची...

CM Eknath Shinde : मान्सून दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

मुंबई : सध्या मुंबईत अधूनमधून ढगाळ वातावरण होत असून लवकरच मान्सून (Monsoon) सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईची दरवर्षीप्रमाणे तुंबई होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. पावसात मुंबई व इतर राज्यांत देखील अनेक दुर्घटना घडत असतात. भूस्खलन, दरड कोसळणे, पूर येणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांची आढावा बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात आदेश दिले.

बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, इतर राज्याशी संपर्क करण्याची बाब यावरही चर्चा करण्यात आली. लोकांना संकटाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कसा करता येईल, धोकादायक इमारतीतील लोकांचे स्थलांतरण कसे करता येईल, याचा आढावा घेतला. याशिवाय दुष्काळाबाबत चर्चा झाली असून मदत व पंचनामा यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून NDRF, SDRF सह महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनासारख्या घटना कशा टाळता येतील, याचाही आढावा घेतला. ‘झिरो कॅज्युअल्टी मिशन’ नुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन कसे करता येईल, तसेच तुकड्या वाढवण्यासाठीही चर्चा झाली. यासोबतच यंत्रणा सज्ज आहेत, बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी

मुंबईत काही महिन्यांपूर्वी कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलं होतं. परंतु कोस्टल रोडच्या बोगद्यांच्या भिंतींना गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी केली आणि दुरुस्तीबाबत सूचना केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -