उपमुख्यममंत्री फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
मुंबई : जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात त्यांच्यावर मी बोलत नाही. मी ऐकलं आहे की ते लंडनमध्ये आहेत, तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. तिथे योग्य ते उपचार त्यांनी घ्यावेत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उबाठाच्या मुखपत्रातील आपल्या लेखात केलेल्या एका उल्लेखावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर पुतीनप्रमाणे राज्य केलं आहे आणि देशाला गुलाम बनवलं आहे. दहा वर्षांमध्ये गुलाम जन्माला घातले, असा उल्लेख उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उबाठाच्या मुखपत्रातील आपल्या लेखात केला आहे. या लेखाबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना आपल्या खास शैलीत याचा समाचार घेतला.
वर उल्लेख केलेल्या लेखात संजय राऊत पुढे लिहितात, ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची राजवट ४ जून रोजी संपते आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. या दोघांना सत्तेवरुन दूर करण्यासाठीच देशातल्या जनतेने मतदान केले आहे. मोदी आणि शाह यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी शाह यांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण करण्यात आले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही तरीही मोदी हवेत. माती खाऊन जगू असं म्हणणारे अंधभक्त या काळात दिसले. पण ज्यांनी आत्तापर्यंत मोदींना मतदान केलं तो शेतकरी, कष्टकरी वर्गच मोदींच्या विरोधात उभा ठाकला.’
यावरही उपमुख्यममत्री फडणवीस म्हणाले, निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील. आम्ही बहुमत पार केलं आहे. आम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे. मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. शपथविधी कधी होईल हे मी सांगू शकत नाही पण निश्चितपणे मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.