Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यहवामान बदलामुळे रोगराईत वाढ

हवामान बदलामुळे रोगराईत वाढ

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक

माणूस ज्या प्रकारे पृथ्वीचे शोषण करत आहे, त्याच प्रमाणात स्वतःच्या विनाशाचा मार्ग तयार करत आहे. मानवामुळे होणारे प्रदूषण, हवामानातील बदल, जैवविविधतेचे नुकसान, परकीय प्रजातींचे आक्रमण आणि अधिवासांचे नुकसान यामुळे पृथ्वी मानवासह अनेक जीवांसाठी निर्जन बनली आहे. त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहेत. ते मानवाप्रमाणेच प्राणी आणि वनस्पतींनाही धोका निर्माण करत आहेत. जलवायू परिवर्तनाचा परिणाम सखोल समजून घेण्यासाठी नॉट्रेडेम विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली एक नवीन अभ्यास केला गेला. त्याचे परिणाम ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. शास्त्रज्ञांनी याआधी काही रोगांच्या वाढत्या प्रकरणांवर आणि पर्यावरणातील बदलांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मलेरियासारख्या आजारांचा समावेश आहे. मलेरिया पसरवण्यात हवामानबदलाची मोठी भूमिका आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याला दुजोरा दिला आहे. डास उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढतात. दुसरीकडे, त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे हे रोगकारक जीव मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत. परिणामी, या रोगांचा धोका वाढत आहे.

मलेरियाच्या बाबतीत अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे यापूर्वी कधीही मलेरिया या रोगाचा धोका दिसला नव्हता पण आता पसरत आहे. वन्य जीव विविधतेत घट झाल्यामुळे उत्तर अमेरिकेतही लाइम रोगाची प्रकरणे वाढू शकतात. नॉट्रेडेम विद्यापीठाशी निगडित संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांनी हवामान आणि पर्यावरणावरील वाढत्या मानवी प्रभावामुळे गुंतागुंतीच्या समस्या कशा निर्माण होत आहेत, याचा सखोल अभ्यास केला आहे. अभ्यासाशी संबंधित संशोधकांनी लिहिले की, आम्हाला माहीत आहे की, संसर्गजन्य रोग वाढत आहेत आणि मानव वातावरणात व्यापक बदल करत आहेत. संसर्गजन्य रोगांचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर इतर प्राणी आणि वनस्पतींवरही होत आहे. या अभ्यासात, संशोधकांनी संसर्गजन्य रोग जागतिक बदलांना कसा प्रतिसाद देतात हे समजून घेण्यासाठी आठ वेगवेगळ्या भाषांमधील ९७२ पूर्व-अस्तित्वातील अभ्यासातून २,९३८ निरीक्षणांचे विश्लेषण केले.

या अभ्यासात वनस्पती, प्राणी आणि मानवांवर परिणाम करणारे यजमान आणि परजीवी यांचे १,४९७ संयोजन समाविष्ट होते. त्यांच्या विश्लेषणात शास्त्रज्ञांनी पाच घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे, जे जगभरातील पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहेत. यामध्ये जैवविविधतेचे नुकसान, हवामानबदल, रासायनिक प्रदूषण, परकीय प्रजातींचा प्रसार, नैसर्गिक अधिवासातील बदल आणि होणाऱ्या नुकसानाचा समावेश आहे. या अभ्यासात हवामान बदलामुळे वाढणारे तापमान, सरासरी तापमान आणि पावसात होणारे बदल यांचा समावेश आहे. याशिवाय नैसर्गिक अधिवासांना झालेल्या हानीमध्ये जंगलांचे तुकडे होणे, शहरीकरण आदींच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की, संसर्गजन्य रोग पसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जैवविविधता नष्ट होणे. त्यामुळे या आजारांचा प्रसार वेगाने होत आहे. नवीन परदेशी प्रजातींचा उदय, हवामानातील बदल आणि रासायनिक प्रदूषण ही जगातील संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराची सर्वात मोठी कारणे मानली जातात. संशोधनानुसार या बदलांमुळे काही रोग पसरण्याच्या अधिक शक्यता निर्माण होत आहेतच; पण त्यांच्या प्रसाराच्या पद्धतीही बदलत आहेत.

मानव आणि इतर सजीवांमध्ये संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे रोगांचा धोका वाढत आहे. याशिवाय झाडे आणि पिकांवरील रोगांचे प्रमाण वाढल्याने शेती, अन्नसुरक्षा आणि जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. या अभ्यासाशी संबंधित संशोधक जेसन रोहर यांनी म्हटले आहे की, पर्यावरणात झालेल्या अनेक बदलांमुळे प्राणी आणि मानवांमध्ये परजीवी वाढतात. याचा अर्थ असा की, या बदलांमुळे प्राण्यांपासून मानवांमध्ये अधिक रोग पसरू शकतात. तसेच या कारणांमुळे साथीचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांनी संशोधनात म्हटले आहे की, भविष्यात रोगांचे परिणाम अधिक व्यापक होतील. त्यामुळे वाढते उत्सर्जन कमी करण्याची तातडीची गरज अधोरेखित होत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार हवामानातील बदलामुळे आणि तापमानवाढीमुळे रोग पसरवणाऱ्या जीवांसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. शिवाय यामुळे त्यांचा प्रजनन कालावधीही वाढत आहे. अशा परिस्थितीत या परजीवींच्या वाढीमुळे रोगांचा प्रसार होण्याचा धोकाही वाढत आहे. त्याचप्रमाणे रासायनिक प्रदूषणामुळे जीवांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर दबाव येतो.

हवामानबदल प्राण्यांच्या हालचाली आणि निवासस्थानात बदल करू शकतो आणि त्यांच्या नवीन प्रजाती समोर आणू शकतो. हे रोगजनकांच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरू शकतात. तथापि, मानव पृथ्वीवर घडवून आणत असलेले बदल केवळ संसर्गजन्य रोग वाढवत नाहीत, तर कमीदेखील करू शकतात. या अभ्यासातून समोर आलेली सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे किंवा त्यांच्यात होणारे बदल संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करू शकतात. तथापि, जंगलतोडीमुळे रोगराई वाढू शकते, ही कल्पनाही या अभ्यासातून नाकारलेली नाही. तथापि, त्याऐवजी काही परिस्थितींमध्ये धोका वाढू शकतो आणि इतरांमध्ये अधिवास आणि जंगलाचा नाश झाल्यामुळे धोका कमी होऊ शकतो.

जंगलांचा नाश मलेरियापासून इबोलापर्यंतच्या रोगांचा धोका वाढवू शकतो. या नवीन अभ्यासानुसार शहरीकरण होत आहे, तसतसे स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थाही सुधारत आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी होत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक बदल परतवणे त्यांचे वाढणारे दुष्परिणाम दूर करण्यासाठी पुरेसे ठरेल का, हा मोठा प्रश्न आहे. संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी मर्यादित संसाधनांसह जागतिक बदलांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. संशोधकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ठळक केले. उत्सर्जन कमी करणे, परिसंस्थेचे संरक्षण करणे आणि जैविक आक्रमणांना प्रतिबंध करणे या उपायांमुळे जैवविविधतेचे नुकसान कमी होऊन वनस्पती, प्राणी आणि मानवांमधील रोगांचे ओझे कमी होण्यास मदत होऊ शकते. चांगल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची सांगड घालणे आणखी प्रभावी ठरू शकते. मानवी क्रियाकलापांमुळे वाढते प्रदूषण, हवामान बदलामुळे जैवविविधता आणि पर्यावरणाची हानी, परकीय प्रजातींचे आक्रमण आणि अधिवासांचे नुकसान यामुळे अनेक संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहेत. हे रोग मानवांसाठीच नाही, तर इतर प्राणी आणि वनस्पतींसाठीही धोकादायक आहेत.

हवामानबदलामुळे वाढते तापमान, सरासरी तापमान आणि पावसाच्या पद्धतीत होणारे बदल यांचाही या अभ्यासात समावेश होता. पर्यावरणात झालेल्या अनेक बदलांमुळे प्राणी आणि मानवांमध्ये परजीवी वाढतात. याचा अर्थ असा की, या बदलांमुळे प्राण्यांपासून मानवांमध्ये अधिक रोग पसरू शकतात. तसेच या कारणांमुळे साथीचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर पाणी डोक्यावरून जाण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारतातही हवामानातील बदल, विशेषत: तापमान आणि आर्द्रतेतील बदल, काही भागात अतिवृष्टी आणि काही भागांत दुष्काळामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील अनेक भागांमध्ये एच२ एन ३, एडेनोव्हायरस आणि स्वाइन फ्लूसह श्वसन संक्रमणांमध्ये अलीकडे वाढ झाल्याने चिंता वाढली आहे; मात्र या सगळ्यांसाठी हवामान बदलाला जबाबदार धरणे घाईचे होईल.

वातावरणातील बदलामुळे डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सतत वाढत जाणारे तापमान विषाणूंच्या प्रसाराच्या पद्धतीवर परिणाम करतात आणि रोग पसरवणाऱ्यांवरही अनेक प्रकारे परिणाम करते. बदलती हवामान परिस्थिती विषाणूंच्या क्षमतेला आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या रोगांना अधिक अनुकूल बनवते. उबदार आणि दमट परिस्थिती रोग पसरवण्याचे मार्ग, रोगाची वारंवारता आणि तीव्रता या दोन्हींवर परिणाम करू शकतात. हवामानातील बदलांमुळे प्रजातींच्या निवासस्थानात बदल होतो. काही प्रजाती नवीन विषाणूंना अधिक संवेदनक्षम बनवू शकतात. त्यामुळे त्यांची लोकांमध्ये पसरण्याची क्षमता वाढू शकते. उदाहरणार्थ, देशाच्या कोरड्या भागात अतिवृष्टी आणि पूर यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सामान्यत: हे ओल्या भागात होत असते. यामुळे कॉलरा आणि आमांश यांसारखे जलजन्य रोग तसेच मलेरिया, डेंगी आणि चिकनगुनियासारखे रोग वाढतात, असा या संशोधकांचा निष्कर्ष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -