Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीरस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत न झाल्यास कंत्राटदाराकडून काम काढून घेणार

रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत न झाल्यास कंत्राटदाराकडून काम काढून घेणार

मुंबई महापालिकेचा इशारा

मुंबई : महापालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच ७ जून पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत. अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे आणि अन्य दुसरा कंत्राटदार नेमून कामे पूर्ण करावीत. तसेच, या कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा आणि त्याला दंडदेखील आकारावा, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार,अति पालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी ठिकठिकाणी रस्ते कामांची पाहणी केली. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील रस्त्यांच्या कामांची नुकतीच पाहणी करून बांगर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. रस्ते कामाशी संबंधित असलेल्या विविध विभागांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे होण्याकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, विशेषतः अपूर्ण रस्ते कामांमुळे कोणतीही जीवितहानी होवू नये, यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी दिनांक २८ मे रोजी रस्ते कामांचे मूल्यमापन करावे. ज्या रस्त्यांच्या कामांची प्रगती समाधानकारक आढळून येणार नाही, त्याच्याशी संबंधित कंत्राटदारांना नोटीस जारी करावी. तसेच ३१ मे पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास आणि ७ जून पर्यंत रस्ते वाहतूक योग्य स्थितीत न आणल्यास त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे. त्याचप्रमाणे संबंधित काम अन्य कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे. या कामाचा संपूर्ण खर्च मूळ नियुक्त कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करावी, खर्च व दंड तत्काळ वसूल करावा, असे निर्देश बांगर यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

ही कार्य पद्धती मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांसाठी लागू असेल,असेही बांगर स्पष्ट केले. दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, दिसेल तो खड्डा तात्काळ बुजवावा तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ उचलून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -