
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
मुंबई : वाढत्या डिजीटल वातावरणात ऑनलाईन सेवा आवश्यक झाल्या आहेत. मात्र या डिजीटलायझेशनमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये अलीकडच्या काळात अधिकच प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आणखी एका फसवणुकीची भर पडली आहे, ती म्हणजे 'पार्सल स्कॅम'. गेल्या काही महिन्यांत या पार्सल स्कॅमबाबत लाखो लोकांची फसवणूक झाली असल्याची माहिती उघडकीस येत आहे. या प्रकरणाविरुद्ध सरकार कठोर कारवाई करण्यास सज्ज झाले असून महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
काय आहे पार्सल घोटाळा?
फसवणूक करणारे सोशल मीडियाद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात आणि नंतर बनावट कॉल करून तुमची फसवणूक करतात. या बनावट कॉलमध्ये ते तुम्हाला एखाद्या गुन्हेगारी संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगतात. तुमच्या नावावर अवैध वस्तू असलेले पार्सल असल्याचे सांगून ते तुमच्याकडून पैशांची मागणी करतात. तर कधी तुमच्या एखाद्या नातेवाईकांना अटक केल्याचे बनावट कॉलही करतात.
अशी बाळगा सावधगिरी
- कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून फोन आला तर त्याची ओळख पटवून घ्या. तात्काळ पैशांची किंवा संवेदनशील माहिती देण्याची मागणी करणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका.
- संशयास्पद कॉल, संदेश किंवा संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींची माहिती cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या.
- फोनवर कधीही तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. फोन करणाऱ्याची ओळख पूर्णपणे खात्री झाल्याशिवाय माहिती देऊ नका.
- सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना आणि फसवणुकीपासून वाचण्याच्या उपायांची माहिती घेतली पाहिजे.
सरकारच्या या कठोर कारवाईमुळे आणि तुमच्या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणूक रोखणे शक्य आहे.