जाणून घ्या हवामान वृत्त काय म्हणते
मुंबई : देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पावसाच्या सरी (Rain) कोसळत आहेत. तर केरळमध्ये (Keral) मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळत आहेत. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) या आठवड्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्वचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार या भागात आज पावसाच्या सरी कोसळणार असून उन्हाची काहीली कमी होणार आहे. तर अजूनही काही भागात उष्णतेचे तापमान कायम राहण्याचा अंदाज दिला आहे.
मुंबई आणि कोकणात सध्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि काही उपनगरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच शहराचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहिल असे सांगितले आहे.
‘या’ भागात उष्णतेची लाट
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानमधील बारमेर येथे उच्चांकी ४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, कोकण परिसरात पुढील दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता असून १० जूनपर्यंत मुंबई व कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. तर १५ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.