
पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा
पुणे : ''हो, मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. पण अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो,'' असा पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुलासा केला आहे.
पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता, याचा खुलासा सीपींनी करावा आणि अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.
अजित पवार यांचा फ़ोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा. https://t.co/TAQjGo8NIm
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2024
त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी कधीच कुणाला सोडण्यासाठी फोन केला नाही, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे बेजबाबदारपणाचे कृत्य होते. नातू, वडील, आजोबांवर कारवाई केली.. जो दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो.
ते पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. सुनील टिंगरे यांचे नाव घेतले जात होते, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. चौकशीअंती 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल, असे ते म्हणाले.