शीव रुग्णालय अपघात प्रकरण
मुंबई : शीव रुग्णालयाच्या परिसरात एका महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शव विच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणाचे पुरावे जमा करण्यात पोलिसांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे जामिनीवर असलेले डॉक्टर ढेरे यांच्याकडून सर्व पुरावे नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना रुग्णालय प्रवेशास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शीव रुग्णालयाच्या परिसरात शुक्रवारी रात्री डॉ. राजेश ढेरे यांच्या गाडीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण मिळवण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. अपघातानंतर १८ तासांनी डॉ. ढेरे यांनी अटक करण्यात आली होती. मात्र डॉ. ढेरे यांची जामिनावर सुटका झाली आहे.
ढेरे यांचा रुग्णालयातील वावर वाढल्यास अपघातासंदर्भातील पुरावे त्यांच्याकडून नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोपी असलेले डॉ. ढेरे यांना रुग्णालयात येण्याची बंदी घालावी आणि त्यांना कोणतीही जबाबदारी देऊ नये. अन्यथा पुरावे नष्ट होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वर्तवली आहे.