दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
उद्योग-व्यवसायाचे जग प्रत्येकासाठी नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कष्ट, चिकाटी, ठाम निश्चय, अविरत प्रयत्न आणि पुरेसा वेळ आवश्यक आहे. जेव्हा आपण सोबिता तामुलीला पाहतो आणि तिचा गृहिणी म्हणून विचार करतो. तेव्हा आपण असे गृहीत धरतो की, ती एका खेड्यातील चूल आणि मूल सांभाळणारी एक गृहिणी आहे; पण आपण पूर्णपणे चुकीचे आहोत. सोबिता ही एक अतिशय यशस्वी उद्योजिका असून, एक अप्रतिम गृहिणीदेखील आहे. तिच्याकडे आसामी स्थानिक बाजारपेठांमध्ये दोन महत्त्वाच्या, भरभराट करणाऱ्या कंपन्यांची मालकी आहे, हे पाहून खरं वाटणार नाही, मात्र हेच सत्य आहे.
२००२ मध्ये जेव्हा भारतात महिला उद्योजिका अगदी मोजक्याच होत्या, तेव्हा सोबिताने सर्व चौकटी मोडून काढत, व्यवसाय कसा उभारायचा, हे दाखवून दिले. १८ वर्षांच्या या विवाहित मुलीने जी फारशी शिकलेली नव्हती; परंतु अत्यंत हुशार होती, तिने एका साध्या कल्पनेला क्रांतिकारी व्यवसायात रूपांतरित केले. इतकंच नाही तर या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी, तिने गृहिणींची ताकदवान फौजही तयार केली. स्वप्ने पाहणारे बरेच लोक आहेत; परंतु त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे आणि ते सत्यात उतरवणारे मोजकेच आहेत. स्वप्नाळू सोबिता तामुली ही त्यापैकीच एक. २००२ मध्ये, तिने सेंद्रिय खत तयार करण्याचा निर्णय घेतला. इतर महिलांच्या मदतीने ती कल्पना प्रत्यक्षात आणू लागली. गायीचे शेण, केळीचे रोप, गांडुळ, पालापाचोळा हे सर्व आवश्यक होते आणि ते तिच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते. गृहिणी म्हणून तिच्याकडे पैशांची कमतरता होती. मात्र हा कच्चा माल वापरण्यासही अत्यंत परवडणारा होता. तिने घरगुती खत बनवले आणि त्यातूनच करिअर घडवले.
‘केसुहार’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, तिच्या ब्रँडच्या गांडुळ खताला ओळख मिळू लागली आणि देशभरातून त्याला मागणी निर्माण झाली. आताच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याबद्दल आणि चांगले खाण्याबद्दल अधिकाधिक काळजी घेत आहेत. सेंद्रिय अन्नाकडे सगळ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांची मागणीही वाढत आहे, हे आश्चर्यकारक नाही. त्यामुळेच केसुहार या सोबिताच्या सेंद्रिय खताला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सेंद्रिय खत म्हटले की, ते महाग असेल, असे अनेकांना वाटते, पण सोबिताच्या बचतगट ‘सेउजी’द्वारे तयार केलेले सेंद्रिय खताला ५ किलोग्रॅम पॅकेजसाठी फक्त ५० रुपये मोजावे लागतात.
सोबिताला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. तिला तिची कौशल्ये इतर क्षेत्रांत वाढवायची होती. तिच्या पहिल्या उत्पादनाच्या यशानंतर ती थांबली नाही. तिची दृढता आणि चिकाटीमुळे तिच्या कंपनीला अधिक संधी मिळण्यास मदत झाली. सोबिताचा महिला बचतगट तिच्यासोबत होता. सोबिताकडे एक सर्जनशीलता होती. या कौशल्याचा लाभ तिला अजून एका उद्योगात झाला तो म्हणजे जापी निर्मितीच्या. जापी हे खरंतर आसामी संस्कृतीला मूर्त रूप देतात. रूंद रिम्स असलेल्या पारंपरिक शंकूच्या आकाराच्या या टोप्या आहेत. ज्या डोक्यावर आणि सजावटीसाठी आकर्षक दिसतात. आपले कौशल्य वापरून ती टोप्यांना आकर्षक तर करतेच; परंतु ग्राहकांच्या पसंतीला लक्षात घेऊन, त्या पद्धतीने जापी तयार केली जाते. पारंपरिक व्यवसायाचा मार्ग हा मध्यस्थीद्वारे चालतो. या प्रक्रियेत उत्पादन प्रथम मधल्या माणसाला विकले जाते, नंतर ते उत्पादन ग्राहकाला विकले जाते. त्यामुळे उत्पादनाच्या मूळ किमतीत वाढ होऊन, शेवटच्या ग्राहकाला ती वस्तू महाग मिळते. त्यात पुन्हा जो उत्पादक आहे, त्याला पण काही फायदा होत नसे. मध्यस्थी व्यक्तीच यामध्ये गब्बर होई. सोबिताने हे दुष्टचक्र भेदण्याचे ठरविले.
मध्यस्थांवर अवलंबून न राहता, स्वतः विक्री हाताळणे अधिक शहाणपणाचे ठरेल, हे तिला उमगले. तसेच इतर मार्गांऐवजी पर्यटक आणि ग्राहकांना आपल्यासारख्या छोट्या बाजारपेठांकडे आकर्षित करणे, हे तिने प्राथमिक ध्येय निश्चित केले होते. अशाप्रकारे आपले उत्पादन थेट ती ग्राहकांना विकू लागली. जापीच्या यशानंतर सोबिता आता अगरबत्ती निर्मितीकडे वळली आहे. स्वस्थ बसणे, तिच्या स्वभावातच नाही. अनेक कल्पना तिच्याकडे आहेत. त्या कल्पकतेचा वापर करून, बचतगटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना सोबिता सक्षम बनवत आहे, हे विशेष.
एक दशकापूर्वी जेव्हा तिने पहिल्यांदा सुरुवात केली, तेव्हा तिला फारसा पाठिंबा नव्हता. तेव्हापासून गोष्टी बदलल्या आहेत. जापी आणि सेंद्रिय खत उद्योगांमध्ये संपूर्ण गावाचा समावेश होतो. त्यांना आता समजले आहे की, अगदी शुल्लक कल्पनांमध्येही क्षमता असते. सुरुवातीला लोक थट्टा मस्करी करायचे; पण आता तेच लोक तिच्या धाडसाचे, जिद्दीचे कौतुक करतात. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या तुलनेत सोबिताचा व्यवसाय अगदीच नगण्य आहे. या शहरात कोटींच्या घरात व्यवसाय करणाऱ्या उद्योजिका आहेत. मात्र आसामसारख्या दुर्गम राज्यातील एका खेड्यातील सोबिता जेव्हा एकटी पुढे येते. पारंपरिकतेच्या चौकटी मोडून काढत, व्यवसायाला सुरुवात करते. आपल्यासोबत गावातील महिलांना रोजगार देते, तेव्हा ती गोष्ट लाखमोलाची ठरते. सोबिता खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताची लेडी बॉस ठरते.
[email protected]