निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
प्राचीन काळी युद्धामध्ये शस्त्र आणि अस्त्र हे निसर्गाला हानिकारक नव्हते, ते फक्त मानवालाच हानिकारक होते; परंतु आता दिवसेंदिवस मानव परमाणू बॉम्ब बनवण्याच्या नादात निसर्गाला सुद्धा खूप मोठी हानी पोहोचवत आहे. त्याक्षणी त्याच्या मनात हा विचार का डोकावत नाही की, निसर्गाची हानी सर्व जीवसृष्टीलाच हानिकारक आहे! फक्त त्या देशापुरतीच मर्यादित राहणार नाही. याचा अर्थ हा समजावा की, स्वतःला बुद्धिमान म्हणवणारा मानव स्वार्थापोटी निर्बुद्ध झालाय. खरंच दुर्दैव आहे. म्हणूनच या बुद्धिमान मानवाला कायमच शेखचिल्ली म्हणत असते.
रासायनिक शस्त्रांमध्ये त्यातील वायू, द्रव किंवा घन यातील विषारी घटकांमुळे सर्वच जीवसृष्टीचा विनाश नक्कीच आहे. लँड माईन्स, ग्रॅनेड्स, एरिया बॉम्ब, मिसाईल अशी अनेक प्रकारची रासायनिक एजंट शस्त्रे आहेत. रासायनिक घटकांमध्ये नर्व्ह एजंट्स, चोकिंग एजंट्स, ब्लिस्टर एजंट्स, ब्लड एजंट्स, इनकॅपॅसिटंट्स, तणनाशकांचा आणि दंगल-नियंत्रक एजंट्स यांचा समावेश आहे. रासायनिक शस्त्रांचा शीतयुद्धात अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर याच्यावर बंदी घालण्यात आली. आधुनिक काळातील सर्वात मोठे शस्त्र ‘आण्विक शस्त्र.’ रासायनिक शस्त्र निसर्गाचा सुद्धा बळी घेत असतात. पहिल्या महायुद्धात ब्लिस्टर एजंट्स वापरल्यामुळे, अनेक प्राणघातक शारीरिक परिणाम झाले. जर मानवावर हे परिणाम झाले, तर वातावरणात आणि जीवसृष्टीत काय परिणाम झाले असतील? पारंपरिक शस्त्र ही फक्त मानव आणि तेवढ्याच शत्रुजीवापुरती मर्यादित होती. आधुनिक आणि पारंपरिक शस्त्रांमध्ये हाच फरक आहे.
‘ए ट्वेंटी थ्री’ ज्याच्यात किती तरी देश बसतील, एवढा मोठा हा हिमखंड आहे. जो आता अंटार्टिकापासून वेगळा होऊन, पाण्यात तरंगत आहे. याचा अर्थ समुद्राच्या उष्णतेचा उच्चांक वाढला आहे. जर हा बर्फ वितळला, तर समुद्रातील पाण्याची उंची वाढणार. परिणामी त्सुनामी ही येणारच. हा बर्फ वितळणे, हे सर्व जगासाठी जरी धोकादायक असले, तरीही याच्यातील खनिजांचा उपयोग हा समुद्रजीवांसाठी नक्कीच फायद्याचा आहे. निसर्ग हा मानव सोडून, इतर जीवसृष्टीला वाचवेल आणि परत या विश्वाची निर्मिती होईल. ही उष्णता वाढण्याचे, ऋतू बदलण्याची, पंचतत्त्व कमकुवत होण्याची कारणे काय? मानव काय करतो की, ज्यामुळे या पंचतत्त्वाच असंतुलन होतंय! स्वार्थापायी लावलेले अकारण शोध…
अकारण याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे, सांगायची गरजच नाही. कारण यापूर्वी दिलेल्या लेखात याची बरीच उत्तर दिली गेलेली आहेत. पण हे कुठे तरी आपण थांबवायला पाहिजेच. नको ते शोध लावणे बंद करून फक्त आणि फक्त या पृथ्वीला नंदनवन कसे करता येईल, एवढेच पाहावे लागेल. आपले शोध म्हणजेच विध्वंसकता, अराजकता. थोडक्यात काय तर आपला स्वार्थ. हा या विश्वासाठी घातक आहे. आपणच आपल्या हाताने आपल्या आईचा या भूमातेचा अंत करत आहोत. एक सृष्टी संशोधक असल्यामुळे, जेव्हा निसर्गातील प्रत्येक घटकाशी खरंच सुसंवाद साधत असते, तेव्हा प्रत्येक घटक हा स्वतःसाठी नाही, तर सर्व विश्वासाठीच फक्त आक्रोश करतानाच दिसतो. थांबवा आता ही विध्वंसकता, आमचे सुदृढ अस्तित्व आम्हाला हवंय, असंच जणू काही म्हणत असतो.
या पृथ्वीवर सर्वच जीवसृष्टीने फक्त आपले काही कर्म करण्यासाठीच जन्म घेतलाय. प्रत्येकाच्या कर्माची दिशा परमेश्वराने ही विविध पद्धतीनेच ठेवलेली आहे आणि ते कौशल्य देऊनच त्याला या पृथ्वीवर जन्म घेण्यास पाठविले आहे. हे मानव का विसरतो? सगळ्यात महत्त्वाचे या विश्वात हिंदू संस्कृती, संस्कार श्रेष्ठ आहेतच. मग आपण आधुनिक देशांचे अनुकरण का करतो? आपण कुठे कमी पडतो? या सर्वांचा विचार हा करायलाच लागेल. उलट आपले अनुकरण सर्वांनी करावे, अशी आपली संस्कृती असताना, ती आपण जोपासणे आवश्यक आहे की नाही?
अत्यंत वाईट वाटतं सैनिकांबद्दल. आज ते आपले संरक्षण करत आहेत म्हणून आपण सुखात राहतो; पण त्यांनाही सुखात राहण्याचा अधिकार आहे ना? जर युद्धच नसतं, तर सैनिक ही नसते आणि परमेश्वराने दिलेल्या सुंदर जन्माचे सुख त्यांनाही उपभोगता आले असते. सर्व जगातील कोणत्याही धर्मातील असो निसर्ग संरचना संवर्धन करण्यासाठी दृढ असणाऱ्या सुसंस्कारांचा प्रत्येक मानवाने अवलंब केल्यास, आपण या पंचतत्त्वांची घडी बसवू शकू फक्त आणि फक्त त्यासाठी निस्वार्थीपणे या निसर्गदेवतेची आपल्याला सेवा करावी लागेल आणि तीच आपली राष्ट्र सेवा सुद्धा असेल.
जर युद्ध ही संकल्पनाच नसती तर? ही अराजकताच नसती तर! विचार करा पृथ्वीचे खरंच नंदनवन असते. किती सुंदर विश्वस्वर्ग असता हा. पंचतत्त्व संतुलनामुळे या पृथ्वीचा स्वर्ग झालाय, प्रत्येक व्यक्ती खूप सुखात आहे, आनंदात आहे, निर्भय आहे, या सजीवसृष्टीतला प्रत्येक घटक हा निसर्गाचा पुरेपूर आनंद घेत आहे. कुठेही अराजकता, विध्वंसकता, आतंकवाद नाही. विचार केला तरी मन सुखावून जातं. सिद्धार्थ राजा ज्याने युद्धाचे परिणाम पाहिले आणि युद्धविराम देऊन सर्वच गोष्टींचा त्याग करून जगत शांतीसाठी निघाले. तेच आपले ‘ज्योतीपुंज गौतम बुद्ध.’ अहिंसा, सत्याचा आणि अष्टांग प्रसार करून सर्व दुर्गुणांपासून मुक्त होण्यासाठी जनजागृती केली. आता युद्ध नको, तर खऱ्या अर्थाने बुद्ध हवाय! जर हे सगळं थांबवायचं असेल, तर आपल्याला सुद्धा महापुराण, गीता, रामायण, गरुड पुराण यांचा अर्थ समजून घ्यावाच लागेल.
नशीबवान आहोत की, आपण भारतीय आहोत. परमेश्वरी शक्ती, चैतन्य यावर विश्वास ठेवून भक्तिमार्गाने आयुष्य हे सफल होऊ शकतं. आपल्याकडे परमाणू बॉम्ब ठेवण्यापेक्षा उच्च मनःशांती विचारांचे भांडार ठेवणे आवश्यक आहे. अहिंसा ही मानसिक आणि शारीरिक दोन्हीही झाली पाहिजे. जशी आपण गृहशांती करतो, तसेच युद्धशांती होण्याची तत्त्वे स्वीकारली पाहिजेत. या विश्वशांतीसाठी दुर्गुणांचे, नकारात्मकतेचे दहन करून सकारात्मकतेची ऊर्जा सर्वांनी ग्रहण केली पाहिजे. आज भारतामध्ये अनेक साधू-संत आहेत, जे विश्वशांती करण्याचा खूप प्रयत्न करीत आहेत. जर सर्व जगाने हे समजून घेतले आणि प्रत्येक व्यक्ती जर त्या मार्गावर चालली, तर आपल्या परिपूर्ण संस्कृतीमुळे खरोखर ‘युद्ध शांती’ होऊ शकेल. मनःशांती, वास्तुशांती, ग्रहशांती मग युद्धशांती का नाही? आपल्यावर असणाऱ्या संस्कारांचा जर आपण योग्य मार्ग पत्करला, तर युद्ध हा शब्द विश्वकोशातून निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने ‘युद्धशांती’ होईल.