श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा विश्वशांती मंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्र दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. १२व्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले.
कोकणी बाणा – सतीश पाटणकर
श्री दत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा विश्वशांती मंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. या भूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले, तरी ती पुण्यभूमी आहे. एका शुभ दिनी त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले की, ‘आम्ही आपणावर प्रसन्न आहोत, आता आपण ग्रहस्थाश्रम पुढे चालवावा. आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ.’ सदर साक्षात्कारानंतर गणेश भट्ट पुन्हा माणगावी परतले व संभवामी युगे युगे श्रावण कृ. ५, इ. स. १८५४ या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वासुदेव असे ठेवले. दुसऱ्या वर्षीपासून खासगी शिक्षण सुरू झाले. ५व्या वर्षी हरिभट्टांकडून धार्मिक शिक्षण घेऊ लागले. ८व्या वर्षी मौजीबंधन झाले. १२व्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली.
वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत, त्यांचे नृसिंह वाडीत जाणे-येणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली. आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी. नृसिंह वाडीहून माणगावी जात असता, मार्गात कागल येथे एक मूर्तिकार भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. वासुदेव भटजी म्हणाले, ‘माझ्याकडे पैसे नाहीत, तर आपण सावकाश हप्त्याहप्त्याने जसे जमेल, तसे पैसे द्यावे’ असे सांगितले व ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगावी पोहोचले. ग्रामस्थांना दृष्टांताची माहिती मिळताच, सर्वांना अत्यानंद झाला. माणगाव निवासी एका वृद्धेला स्वप्न दृष्टांत झाला की, आपली जमीन दान करावी, त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली. प. पू. टेंबेस्वामींनी स्वत:च ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्त मंदिर बनविले. तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली, तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्त मंदिर. नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत, ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थानमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार यांसारख्या सेवांमध्ये अर्थदानाने संमिलित होता येते. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार, मंदिर स्थापनेपासून ७ वर्षांनी माणगाव सोडले, ते परत कधीच माणगावात आले नाहीत.
श्रींच्या मंदिरापासून १५-२० मिनिटांच्या अंतरावर अवघड पायवाटेने झाडेझुडपे पार केल्यानंतर, श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे. या ठिकाणीच ध्यान-धारणा करून, श्री स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना प्रसन्न करून घेतले. मुंबईचे एक सिद्ध पुरुष श्री सदानंद ताटके ऊर्फ आनंदस्वामी यांनी गुहेपर्यंत पायऱ्या करून घेतल्या आहेत. गुहा म्हणजे दोन दगडांमधील पोकळी आहे. ही नैसर्गिक गुहा साधारण १५ X १५ आकाराची असून, आत छोटीशी वासुदेवानंद सरस्वतींची मूर्ती आहे. येथे २४ तास पणती तेवत असून, तेथे साधकांस अत्यंत अनुभव येतात. उच्च कोटीची स्पंदने जाणवतात. मन:शांती काय असते, याचा खरा अनुभव येथे जाणवतो. दत्त भक्त येथे जप, ध्यानधारणा, गुरुचरित्र पारायणही करताना जाणवतात.
श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामी महाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून, त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे.
प्रबंधात्मक संशोधनाचा साधक आणि उपासक, आर्त, अर्थार्थी अशा भक्तांना प्रेरणा व अमृतानुभव मिळावा, तसेच जिज्ञासूंना परिचय व्हावा म्हणून ५५०० पृष्ठांचे वाङ्मय श्री स्वामी महाराजांनी दत्त प्रभूंच्या कृपेने तयार केले. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली. पू. स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधी समोर श्री स्वामीजींच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. १९१४ मध्ये गरुडेश्वर मुक्कामी नर्मदामातेच्या कुशीत समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)