Thursday, July 18, 2024
Homeक्राईमSangli bank scam : सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मदतनिधीवर डल्ला! तब्बल २.४३...

Sangli bank scam : सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मदतनिधीवर डल्ला! तब्बल २.४३ कोटी रुपयांचा अपहार

संचालकांच्या चेल्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाल्ले पैसे; ८ जण निलंबित

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Sangli District Central Co-operative Bank) शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे. या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २२० शाखा आहेत. मात्र, या बँकेतील दुष्काळ निधीबाबत ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा झाला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करत ८ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या तपासणीनंतर दुष्काळ आणि अवकाळ निधीवर मारण्यात आलेला डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुष्काळ, अवकाळ, अतिवृष्टीच्या निधीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच सहा ते सात कोटींवर डल्ला मारल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हा बँकेतल्या मदत निधीतील या गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम २५ ते ३० कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. स्वतंत्र भारत पक्षाकडून याबाबत ज्या शाखेत हा प्रकार झाला त्याची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या नेलकरंजी (ता. आटपाडी), बसरगी (ता. जत) शाखा आणि तासगाव तालुक्यातील मार्केट यार्ड शाखेसह निमणी, हातनूर आणि सिध्देवाडी शाखेत अपहार झाल्याचे उघडकीस आले. सहा शाखांमध्ये दोन कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार झाला असून त्यातील ९३ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित एक कोटी ५३ लाख रुपये वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

कर्मचाऱ्यांचा मदतनिधीवर डल्ला

सांगली जिल्हा बँकेत १३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असून ठेवी सात हजार ९०५ कोटी रुपयांच्या आहेत. हजारोंवर कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकेत ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा बँकच शेतकऱ्यांना आधार आहे. पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारीच बँकेतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारत आहेत.

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे. काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळे चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्याऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्याऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये १० कर्मचाऱ्यांनीच जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असण्याची शक्यता आहे.

गैरप्रकार करणारे कर्मचारी संचालकांचे चेले?

सांगली जिल्हा बँकेच्या रकमेवर डल्ला मारलेले कर्मचारी बँकेच्या संचालकांचे चेले आहेत. या चेल्यांच्या इशाऱ्यावरच जिल्हा बँकेच्या शाखांमधील कारभार चालू आहे. एखादा शाखा अधिकारी अपहाराबद्दल कर्मचाऱ्यास नडला तर त्याची लगेच उचलबांगडी केली जात आहे. या भीतीमुळेच बँकेच्या गैरव्यवहाराकडे शाखा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

घोटाळेबाज कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर, त्याच्यावर प्रथम गुन्हा दाखल केला पाहिजे, संचालकांचा हस्तक्षेप डावलून प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे. या प्रकरणी सहकार विभागामार्फत चाचणी लेखा परीक्षण करण्यात यावे आणि सबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबतीत आम्ही सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचेही स्वतंत्र भारत पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -