स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये एका धनाढ्य पुत्राने मद्याच्या नशेत बाईकवरून जाणाऱ्या दोन कॉम्प्युटर्स इंजिनीअर्सना उडवले व त्यात दोघांचाही मृत्यू झाला. वेदांत आगरवाल हा पुण्यातील ब्रह्मा समूहाचे मालक असलेल्या विशाल आगरवाल याचा मुलगा. वय १७ वर्षे ८ महिने. पण वयाने १८ वर्षे पूर्ण नसल्याने, त्याला न्यायालयाकडून सहानुभूती मिळाली. या पराक्रमी अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी झाली. या घटनेने पुण्यातच नव्हे, तर देशभर संतापाची लाट उसळली. महापालिका प्रशासन, पोलीस, राजकारणी व लोकप्रतिनिधी यांचे मेतकूट असेल, तर गुन्हेगारांना रान मोकळे असते, बेकायदा वागणाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नसते, त्याचीच प्रचिती पुण्याच्या घटनेनंतर आली.
मुंबईसारख्या महानगरात ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’विरोधात पोलिसांची सतत मोहीम चालू असते. मध्यरात्रीनंतर मुंबईभर नाकाबंदी केली जाते. मोटारी व बाईक्स भरधाव चालविणाऱ्यांना रोखले जाते, त्यांच्या तोंडात पाइप घालून त्यांनी मद्यपान केले आहे का, याची चाचणी होते. मद्यपान केले असेल, तर त्या चालकाचा लगेचच मोबाइल काढून घेतला जातो व त्याची पोलीस कोठडीत रवानगी करून, दुसऱ्या दिवशी न्यायालयात उभे केले जाते. अशा कारवाईमुळे ड्रंक ॲण्ड ड्राइव्हला लगाम बसतो. तसेच हिट ॲण्ड रन प्रकरणांवरही नियंत्रण राखले जाते. जर मुंबई पोलीस असे कठोर वागू शकतात, तर पुणे पोलीस का ढिसाळ वागतात?
गेल्या काही वर्षांत पुणे महानगर हे आडवे-तिडवे प्रचंड विस्तारले आहे. पुणे महानगराची लोकसंख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. परप्रातींयांचे लोंढे व शिक्षण-रोजगारासाठी पुण्याकडे आकर्षित होणारे तरुणांचे तांडे यांतून पुण्याचे मराठीपण घुसमटले जात आहे. पुण्यात सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. हॉटेल्स, पब्ज, बार, रिक्षा, टॅक्सीज तसेच सुखसोयी देणाऱ्या अनेक मुबलक सेवा रात्रभर हजर आहेत. खिशात पैसे असतील, तर ते उधळायला पुण्यात चोहोबाजूला मुबलक संधी आहे. गेल्या दोन दशकांत पुण्यात चंगळवादी संस्कृती फोफावली. त्यातूनच हप्ते, वसुली, पाकिटे यांचा लोभ वाढला आहे. चैन आणि चंगळवाद म्हणजे एकाने पैसे उधळणे आणि दुसऱ्याने कमावणे असे दोन्ही वर्ग आपले काम करीत असतात. सरकारी यंत्रणा म्हणजेच प्रशासन, पोलीस हे कारवाईपेक्षा वसुलीत जास्त रस घेत असतात. सर्वच लहान-मोठ्या शहरांत हेच कमी-अधिक प्रमाणात चालू असते.
अडीच कोटी रुपये किमतीची ग्रे पोर्श ही आलिशान मोटार घेऊन, बारावीचा विद्यार्थी असलेला, बिल्डरपुत्र आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला बाहेर कसा पडू शकतो? आपल्या लाडक्या लेकाला त्याचे पप्पा रजिस्ट्रेशन न झालेली व नंबर प्लेट नसलेल्या मोटारीची चावी देतातच कशी? बारावीचा निकाल लागला म्हणून हे पराक्रमी लेकरू मित्रांना पार्टी देण्यासाठी बाहेर पडताना, त्याच्या पप्पांनी खर्चाला किती पैसे दिले? कल्याणी नगरच्या पबमध्ये त्याने ९० मिनिटांत ४८ हजारांचे बिल मोजले, त्या अगोदर तीन तास त्यांची पार्टी वेगळ्याच हॉटेलला चालू होती.
मुळात वडिलांनी खरेदी केलेल्या पोर्श या महागड्या मोटारीला नंबर प्लेट नाही, आरटीओकडे ४४ लाख रुपये टॅक्स भरला नाही म्हणून त्याचे रजिस्ट्रेशन झालेले नाही, बिल्डर पुत्राकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, त्याने मोटार चालविण्याचे प्रशिक्षणही घेतलेले नाही, आपला पोरगा दारू पितो, हे वडिलांना चांगले ठाऊक आहे, तरीही नवीन गाडी घेऊन पार्टी करा, असे बाप सांगत असेल, तर तोही तेवढाच दोषी आहे. पोराने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमी वेगाने मोटार चालवली आणि बाईकला ठोकर दिली, त्यात अनिस अवधिया व त्याच्या मागे बसलेली त्याची मैत्रिण अश्विनी कोस्टा हे जागीच ठार झाले. ही घटना रात्री २.३० वाजता घडली. त्या दोघांच्या मृत्यूला वेदांत हाच जबाबदार असू शकतो, या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहे.
रात्री उशिरा पबमध्ये दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुंबईत ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहिमेत मद्याच्या नशेत गाडी चालवणाऱ्याला पहिल्यांदा सापडला तर १० हजार रू. दंड व सहा महिने जेल व दुसऱ्यांदा गुन्हा केला, तर १५ हजार दंड व २ वर्षे जेल अशी शिक्षा दिली जाते. गाडी चालवताना मोबाइलवर बोलताना आढळले, तरी ५ ते १० हजारांचे चलान फाडले जाते. वाहन चालवताना चालकाचे दोन्ही हात स्टिअरिंगवर असले पाहिजेत, हा नियम आहे. मग बेफाम वेगाने कार चालविणाऱ्या बिल्डरपुत्र वेदांतचे नियंत्रण तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला काय सहानुभूती दाखवायची का?
अपघातात मरण पावलेल्या अश्विनीला १८ जूनला जबलपूरला तिच्या घरी जायचे होते, तिकीटही काढले होते, वडिलांना वाढदिवसानिमित्त ती सरप्राइज गिफ्ट देणार होती; पण वेदांतच्या राक्षसी ड्रायव्हिंगने तिचा बळी घेतला. तिचा मृतदेह ससूनच्या शवागरात आला, तेव्हा “कुणाच्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला का” असा प्रश्न विचारत, तिच्या मातेने हंबरडा फोडला. अश्विनीने पुण्यातील वाडिया कॉलेजमधून कॉम्प्युटर पदवी घेतली, तर अतिशने डीवाय पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. दोघे जॉन्सन कंट्रोल कंपनीत होते, तिथेच त्यांची मैत्री झाली.
पुण्यात आठपैकी पाच आमदार भाजपाचे आहेत. मावळत्या पुणे महापालिकेत भाजपाचे १०० नगरसेवक होते. कल्याणी नगरच्या भीषण घटनेनंतर हे सर्व लोकप्रतिनिधी कुठे होते? काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रस्त्यावर धरणे धरून आवाज उठवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस कमिशनरच्या कार्यालयात आल्यावर, भाजपाचे पदाधिकारी निवेदन घेऊन धावले. कल्याणी नगर घटनेनंतर येरवडा पोलीस स्टेशनवर भेट देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे स्वत: वादाच्या भोवऱ्यात सापडले.
आपण पोलिसांवर दबाव टाकलेला नाही, असा खुलासा करण्याची पाळी त्यांच्यावर आली. पहाटे २.३० वाजता आरोपी वेदांतने दोघा जणांना उडवले, ते जागीच मृत्युमुखी पडले; पण त्याच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी दुपारनंतर पाठवण्यात आले, हा विलंब कशासाठी? रक्ताचे नमुने दोन वेळा घेतले याचे कारण काय? पोलिसांनी अगोदर भारतीय दंड विधान ३०४ (अ) कलम लावले होते; पण सोशल मीडियावर दबाव वाढल्यानंतर ‘३०४’ असे कलम लावले, हे खरे का? सुरूवातीला जामीन मिळाल्यावर, वेदांतने रॅप साँग तयार केले. मिली बेल, फिर से दिखाउंगा सडक पे खेल अशी मस्ती त्या गाण्यात होती, हे पोलिसांना ठाऊक आहे का? अपघाताच्या वेळी पोर्श गाडी वेदांत नव्हे, तर ड्रायव्हर चालवत होता, असे त्याचे पप्पा विशाल व त्याचे आजोबा सांगत आहेत, त्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणला जातो आहे का? येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला, याची कबुली पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनीच दिली आहे, याचा अर्थ पोलीस वेदांतला वाचविण्याचे काम करीत होते का? वेदांतला भूक लागली म्हणून पोलिसांच्या ताब्यात असताना, त्याला बर्गर व पिझ्झा देण्यात आला का? स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे भल्या सकाळी पोलीस स्टेशनवर गेले होते, ते कुणाच्या सांगण्यावरून व तिथे त्यांनी काय सांगितले? वेदांतचे आजोबा सुरेंद्र आगरवाल याचे अंडरवल्ड कनेक्शन आहे, हे यानिमित्ताने पुढे आले.
गर्भश्रीमंत बापाच्या मुलाने दोघांची हत्या केल्यावर, त्याला (बाल) न्यायालयाने ३०० शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा दिली, हीच शिक्षा ओला-उबर किंवा टॅक्सी-ट्रक चालकाने तसा गुन्हा केला तर त्यांना देण्यात येईल का? बाईक चालवताना डोक्यावर हेल्मेट नसेल किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडला किंवा जवळ पीयूसी नसेल, तरी पोलीस दंड आकारतात, रात्री १०नंतर फूटपाथवर पावभाजी किंवा बुर्जीपाव विक्रेत्यालाही हटवले जाते. मग ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, आलिशान गाडीला नंबर प्लेट नाही, गाडीचे रजिस्ट्रेशनही झालेले नाही, अशी गाडी अल्पवयीन मुलगा पुण्याच्या रस्त्यावरून ताशी १६० किमी वेगाने मद्याच्या नशेत कशी पळवतो? पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ, एक्ससाईज, कोणालाच काही दिसत नाही का? पुणे पोलिसांवर चौफेर टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस योग्य पद्धतीने काम करीत आहेत, हे सांगण्यासाठी पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये यावे लागले, हे काय भूषणास्पद आहे का? रात्रभर धुडगूस नि धिंगाणा घालणाऱ्या बेकायदा बार व पब्जवर पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने वेळीच बुलडोझर चालवला असता, तर वेगवान पोर्शखाली दोन तरूण कॉम्प्युटर इंजिनीअर्स चिरडले गेले नसते. ‘हिट ॲण्ड रन’ हे भ्रष्ट व्यवस्थेचे बळी आहेत…!
[email protected]
[email protected]