Sunday, May 25, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

Duniyadari : ११ वर्षांनंतर पुन्हा होणार फ्रेंडशिपचा खेळ; दुनियादारी पुन्हा एकदा थिएटरमध्ये!

Duniyadari : ११ वर्षांनंतर पुन्हा होणार फ्रेंडशिपचा खेळ; दुनियादारी पुन्हा एकदा थिएटरमध्ये!

आत्ताच जाणून घ्या कुठे आहेत याचे शोज...


मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi Cinema) अत्यंत गाजलेल्या सिनेमांपैकी ‘दुनियादारी’ (Duniyadari) हा एक सिनेमा आहे. दुनियादारी प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात त्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. मराठीतील उत्तमोत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या तितकेच लक्षात आहेत. दिग्या, श्रेया, शिरीन, मिनू या पात्रांना आणि त्यांच्यातील मैत्रीला प्रेक्षकांनी आपलंसं केलं. आजही या पात्रांवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत असतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) याने पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


दुनियादारी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तो पुन्हा एकदा ११ वर्षांनी रिलीज होणार असल्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे. ठाणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, मरिन लाइन्स, हिंजेवाडी, बंड गार्डन रोज, अकुर्डी येथील थिएटर्समध्ये दुनियादारी हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. अंकुश चौधरीने याबाबत पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, '११ वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये... दुनियादारी'. यासोबतच या चित्रपटाचे शोज कुठे आणि किती वाजता असणार आहेच याबाबत त्याने एक पोस्टर शेअर केलं आहे. आता प्रेक्षक दुनियादारी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक झाले आहेत.



लवकरच दुनियादारी २ देखील येणार


काही दिवसांपूर्वी दुनियादारीमध्ये शिरीनचं पात्र साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. सई म्हणाली, “आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. ती खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केलेली नाही आणि मला आशा आहे की आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करतोय. “ सईच्या घोषणेमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला.


मात्र, याबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. दुनियादारी सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधवने केलं होतं. यानंतर आता सिनेमाच्या दुसर्‍या भागात नेमकं काय पाहायला मिळणार? कोणकोणते कलाकार असणार? या सगळ्याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment