Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजशब्दवीण संवादू...

शब्दवीण संवादू…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

निशब्द क्रिया…
‘ मी कशी शब्दात सांगू
भावना माझ्या तुला…
तू… तुझ्या समजून घे…

किती सुंदर शब्दांकित केले आहे, हे गाणे… न बोलताही भावपूर्ण ओळी आहेत!
खरंच आयुष्यात किती तरी प्रसंग असे येतात… तिथे शब्दांची गरज नसते, शब्दांची जागा डोळ्यातील भाव किंवा नुसत्या स्पर्शाने समजली जाते! डोळे खूप काही सांगून जातात… न बोलता खूप काही समजूनही जातात… स्पर्शही बोलून जातो… तिथे कधी कधी संवादाची गरजही नसते!
राग, प्रेम, समजावणं, धीर देणं, आधार देणं… असे सगळे भाव डोळ्यात दिसतात न बोलताही!
निशब्द संवाद…
डोळ्यांचा…
स्पर्शाचा…
मनाने भावना व्यक्त होतात,
जेव्हा शब्द माघार घेतात…
नजर व स्पर्शाने पोहोचता येतं मनापर्यंत!
पलकों के पिछे से क्या कह डाला…. फिर से तो फरमाना….
पापण्याआडून व्यक्त झालेलं प्रेम!
भावनांची शब्दांमध्ये देवाणघेवाण करण्याचे वरदान फक्त मानवालाच प्राप्त झालं आहे!

सुख-दुःखात… कधी नजरेतून… तर कधी स्पर्शातून एकमेकांना समजून घेता येतं, स्पर्शामध्ये अनेक अर्थ सामावले असतात… स्पर्श लाजरे असतात… बुजरे असतात… मायेने ओथंबलेले असतात… तर कधी आक्रमक ही असतात… स्पर्श बोलके होतात, तेव्हा त्या त्या वेळचे अर्थ कळत जातात…

स्पर्श रेशमी असतात… जाडे भरडे असतात… बोचरे असतात… आश्वासक ही असतात… स्पर्श जपले पाहिजेत!
अशाच भावना डोळ्यांतही वेळप्रसंगी बघायला मिळतात, फक्त त्या वाचता आल्या पाहिजेत!
‘आपला माणूस’ या सिनेमात नाना पाटेकरच्या मुलाला करडा सवाल….’ शेवटचा स्पर्श कधी केला होतास रे… म्हाताऱ्याला?’

शहारून टाकतो हा प्रश्न…
लहान बाळाला जसा स्पर्श केल्याने, ते आश्वासक होतं… तसेच म्हाताऱ्या जीवाचंही असतं… कुठल्याही वयात स्पर्शाचं महत्त्व वेगळं असतं, धीर देणारं असतं! पाठीवरचा स्पर्श… मी पाठीशी आहे सांगतो!

वडिलांच्या नजरेत प्रेमळ धाक तर स्पर्शात आधार असतो! आईच्या नजरेत ममता तर स्पर्शात दिलासा असतो!
जरा नजरों से कह दो जी…
कधी गर्दीत, कधी एकले पणात शब्द ही मौन पाळतात व्यक्त होण्याआधी! मग डोळे अन् स्पर्श असतात, संवाद साधण्यासाठी!

‘छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा…’
फक्त समजायला पाहिजे…
अर्थपूर्ण निशब्द संवाद!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -