प्रगती पुस्तकावर दिलेल्या नंबरवर कॉल केला आणि…
छत्रपती संभाजीनगर : बालविवाह (Child Marriage) हा कायद्याने गुन्हा आहे हे माहित असूनही अनेक ठिकाणी लहान वयातच मुलींची लग्नं लावून दिली जातात. याबाबत अजूनही काही ग्रामीण भागांत पुरेशी जनजागृती झाली नाही. पण हल्लीची मुले हुशार नक्कीच झाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका घटनेत मुलांनी आपल्या हुशारीचा योग्य प्रकारे वापर करत वर्गमैत्रिणींची बालविवाहापासून सुटका केली आहे. महाराष्ट्रातील एका उपक्रमामुळे आणि वर्गमित्रांच्या सजगतेमुळे १२ बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेत घडलं असं की, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात सर्वांचे निकाल जाहीर झाले. विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवणारं प्रगती पुस्तक प्रत्येकाच्या हातात आलं. यावेळी या प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले होते. बालविवाहसारख्या प्रथा रोखण्यासाठी सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक (Child helpline number) देण्यात आले होते. याच हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून तब्बल १२ बालविवाह रोखण्यात आले.
महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचे बालविवाह होत होते, त्या मुलींच्या वर्गमैत्रिणींनी आणि वर्गमित्रांनीच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून हे बालविवाह रोखले. १०९८ आणि ११२ हे चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक आहेत. या क्रमांकावर फोन केल्यास पीडित आणि घटनेची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते.