बिहारमध्ये गोरगरिबांना लुटणार्यांना तुरुंगात जावंच लागेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमधून हल्लाबोल
पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदान (Voting) पाच टप्प्यांत पूर्ण झाले असून आज देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात बिहारमधील ४० जागांपैकी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. अंतिम टप्प्यात मतदान होत असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश व बिहार ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) बिहारमध्ये जाहीर सभा घेत स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटलीपुत्रनंतर काराकाट येथे जाहीर सभा घेतली. येथील एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी मोदींची सभा पार पडली.
मोदींनी बिहारमधून इंडिया आघाडी आणि आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये गरिंबाना लुटणारा कितीही मोठा शहंशाह असो, कितीही मोठा राजकुमार असो, त्याला तुरुंगात जावेच लागणार. तुरुंगातील भाकरी खावीच लागेल, ही एनडीए सरकार आणि मोदीची गॅरंटी आहे, असे मोदीजींनी म्हटले.
या सभेत नोकरीच्या बदल्यात जमीन देण्याच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मोदींनी लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांनी गरिबांना लुटून नोकरीच्या बदल्यात जमीन लिहून घेतल्या. त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, आता त्यांचं तुरुंगात जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये चक्कर मारणं पूर्ण होताच तुरुंगात जाण्याचा रस्ता निश्चित होईल. बिहारला लुटणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी थेट इशारा दिला आहे.
इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार
४ जून रोजी संध्याकाळी इंडी आघाडीमध्ये फूट पडणार आहे. आरजेडीवाले म्हणतील की काँग्रेसने डुबवलं, हे एकमेकांचे कपडे फाडायला सुरु करतील. तर काँग्रेसचं शाही कुटुंब पराभवाचा ठिपका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर ठेवून विदेशात सुट्टी एन्जॉय करायला जाईल. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाऊन मल्लिकार्जुन खर्गे थकून जातील, असेही मोदींनी म्हटले. तसेच, आरजेडी, काँग्रेस व इंडिया आघाडीला देशाने अनेकवेळा नाकारल्याचीही त्यांनी टीका केली.