कोकणातील लग्नसमारंभ

Share

दीपक गुंडये

असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. तशा त्या बांधल्या जात असतीलही पण जेव्हा त्या गाठी स्वर्गासारख्याच रम्य कोकणात समारंभपूर्वक पक्क्या केल्या जातात तेव्हा तो लग्नसमारंभ खास लक्षात राहण्यासारखा असतो आणि तो अनुभवणे म्हणजे एक पर्वणीच असते. हल्ली लग्नसराई सुरू आहे. सगळीकडेच ती सुरू आहे. उन्हाळा असला तरी लग्नाची लगबग तसूभरही कमी झालेली नाही. कोकणातही लग्नांचा धूमधडाका उडालेला आहे. अशा वेळी कोकणातील पूर्वीच्या लग्नसमारंभांची आठवण न येते तर नवलच.

कधी नात्यातील, तर कधी मध्यस्थांमार्फत वर-वधू संशोधन सुरू होते आणि सर्व बाबी जुळून आल्या की, लग्नाची बोलणी सुरू होते. वाडकऱ्यांसमोर आलेल्या स्थळाची माहिती मांडली जाते. मग वरबघणी, घरबघणी होते. देण्या-घेण्याची बोलणी होतात. ही देणी-घेणी मंगळसूत्र, अंगठी, वधू-वराचे कपडे इतकी माफकच असते. हुंडा हा प्रकार कोकणात नाहीच. मालकोमालकी वधू-वराची पसंती झाली असल्यास वरबघणी, घरबघणी न होता वाडकऱ्यांना किमान प्रवास खर्च दिला जातो. एकदा का लग्नाची बोलणी पक्की झाली की पुढच्या टप्प्यांसाठी वरपक्ष आणि वधूपक्ष तयारीला लागतात.

हल्ली पत्रावळ्या, साखरपुडे तयार मिळू लागले आहेत. पण पूर्वी पत्रावळ्या घरीच बनवल्या जात. चांगली, थोडीसी मोठी वडाची पाने खुडून आणली जात. बांबूपासून बारीक काड्या तासल्या जात. जेवून झाल्यावर दुपारी किंवा रात्री घरातील, वाडीतील माणसे पत्रावळ्या लावायला घेत. मधोमध मोठे वडाचे पान व सभोवताली त्यापेक्षा थोडीशी छोटी वडाची पाने बांबूच्या काड्यांनी शिवली जात. तयार झालेल्या पत्रावळ्या उन्हात सुकवल्या जात. साखरपुड्या बनवण्यासाठी साधी साखर किंवा ती दळून केलेली पिठी साखर वापरली जाई. जुन्या वहीची पाने पुड्यांसाठी वापरली जात. हे करण्यासाठीही घरातील सगळी माणसे बसत असत. हे साखरपुडे लग्न लागल्यानंतर वाटले जात. हल्ली अशा पत्रावळ्या, साखरपुडे बनवणे पूर्णपणे बंद झाले आहे.

लग्न म्हटल्यानंतर पंगती या आल्याच. या पंगतीत वाढल्या जाणाऱ्या भातासाठी लागणारा तांदूळ निवडण्याचाही एक विधी असतो. वाडीतील महिलांना बोलावून एकत्र बसून तो तांदूळ निवडला जातो. अगोदर तांदळाची रास अंगणात पसरली जाते. त्यावर आंब्याची पाने ठेवून हळद कुंकू लावले जाते. सुपांनाही हळदकुंकू लावून त्यात तांदूळ घेऊन जमलेल्या बायकांना दिले जातात. त्यानंतर ते तांदूळ निवडले जातात. याप्रसंगी गाणीही म्हटली जातात. तशी लग्नातील विविध विधीप्रसंगी वेगवेगळी गाणी म्हटली जातातच. लग्नपत्रिका छापून झाल्यानंतर पहिली पत्रिका मंदिरातील देवाला अर्पण केली जाते आणि नंतर नातेवाईक, पाहुणे, सगेसोयरे यांना वाटली जाते. पूर्वी तर लग्नपत्रिका नसताना तोंडी आणि तेही गावोगावी आमंत्रण दिले जात असे.

बस्ता हा प्रकार म्हणजे लग्नसमारंभातील कपडे खरेदीचा खासकरून साडी खरेदीचा कार्यक्रम असतो. वरपक्ष आणि वधूपक्षाकडील माणसे या खरेदीसाठी एकत्र जमतात. बाजारपेठेतील नेहमीचे कपड्याचे दुकान गाठले जाते आणि पसंतीच्या साड्या व नवरदेवासाठी कपड्यांची खरेदी केली जाते. दागिन्यांची मापे घेऊन तीही सोनाराकडून खरेदी केली जातात. साखरपुड्याच्या दिवशी वधूच्या घरी वरपक्षाकडील माणसे जातात. यावेळी विडे मांडले जातात. कोकणात मुलीला अंगठी ही दीराकडून घातली जाते. हल्ली ही प्रथा जवळपास बंद होत चालली आहे. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवसाचे वेध लागतात.

लग्नाच्या अगोदर नववधूला बांगड्या भरण्याची एक प्रथा आहे. त्या भरण्यासाठी कासार येतो. नवरीला हिरव्या बांगड्या भरल्यानंतर घरातील नातेवाईक महिलांना बांगड्या भरल्या जातात. सोबत वाडीतील इतर महिला, मुलीही आपल्या पसंतीच्या बांगड्या कासाराकडून भरून घेतात. त्या सगळ्यांचे पैसे अर्थातच वधूपिता देतो. पूर्वी तांदूळ वगैरे जिनसा दिल्या जात.

लग्नाचा बाजार करतानाही बस्त्याच्या वेळी जसे वाडकरी असतात तसे वाडकरी बाजारपेठेत सोबत असतात. सगळा बाजार झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी एखादे हॉटेल गाठले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ होतो. वराच्या सोबतीला अविवाहित मुलगा (देढा) तर वधूच्या सोबतीला अविवाहित मुलगी (करवली) असते. त्यांची ही सोबत लग्न लागेपर्यंत प्रत्येक विधीसाठी असते. हळद लागल्यानंतर लग्न लागेपर्यंत या सोबत्यांनी त्यांना एकटे सोडायचे नसते.

लग्नाच्या आदल्या दिवशीच मांडव कुडणे हा प्रकार असतो. आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडून आणून त्यांनी मंडप सजवला जातो. लग्नाच्या दिवशी सकाळीच न्हावी बोलावून नवऱ्याची दाढी करून घेतली जात असे. ती झाल्यानंतर हजर असलेला प्रत्येकजण नवऱ्याला ओवाळून न्हाव्याच्या वाटीत पैसे टाकत असे, ते मग न्हावी घेत असे. या विधीला रेघ धरणे असे म्हणतात. त्यानंतर पुण्यवचन पार पडते. मग उष्टावळ म्हणजेच लग्नाअगोदरचे जेवण होऊन वरपक्ष नवरीच्या गावी जायला निघतो. हे वऱ्हाड बहुतेक करून ट्रकमधूनच नेले जाते. ती मजा काही औरच असते. पूर्वी तर चालतच नवरीचे गाव गाठले जाई.

नवरीच्या गावी आल्यानंतर थेट लग्नमंडपात न जाता दुसऱ्या एका घरात वऱ्हाडी मंडळींचे स्वागत केले जाते. त्याला जानवसे म्हणतात. आगतस्वागत झाल्यानंतर वाजतगाजत नवरदेवाला वधूकडील लग्नमंडपात आणले जाते. लग्न लागताना खड्या आवाजात मंगलाष्टके म्हटली जातात. लग्न लागल्यानंतर नवरीकडची पंगत होते. पंगतीच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांची एक वेगळीच गंमत असे. गर्भावळीचे श्लोक, प्रश्नोत्तरांचे श्लोक म्हटले जात. हल्ली हे प्रमाण थोडे कमी झाले आहे. श्लोकांची चढाओढ सुरू झाली की, पंगत लांबत असे. बऱ्याच जणांचे जेवून झालेले असले तरी शेवटचा श्लोक होईपर्यंत तसेच उष्टे हात घेऊन बसावे लागे. मग कोणी तरी पुढाकार घेऊन ‘हरीच्या घरी’ हा श्लोक म्हणत असे आणि पंगत उठत असे.

नंतर आहेर समारंभ झाल्यानंतर वधूची पाठवणी होत असे. नवरीला निरोप देताना साहजिकच वातावरण थोडेसे भावनिक होते. साश्रुनयनांनी वधूला निरोप दिला जातो. रडवेल्या चेहऱ्याने वधू निघाल्यानंतर वरात वराच्या गावी रवाना होते. वराच्या गावी पोहोचल्यानंतर सीमेवर नारळ दिला जातो. वरात सुरू असताना जागोजागी तोरणे उभारली जातात. दोन बाजूला दोघेजण हातात टॉवेल किंवा पंचाची टोके धरून उभे राहतात. यात नारळ टाकल्यानंतरच ते वधूवराला पुढे जाऊ देतात. वरात नवऱ्याकडे आल्यानंतर घरभरणीचा मुहूर्त असतो. वरात त्या अगोदर आल्यास आणि वेळ असल्यास ती थांबवून कसरतीचे प्रकार केले जात. यात बनाटी फिरवणे, तोंडात रॉकेल भरून हातातील पेटत्या मशालीवर त्याचा फवारा सोडून ती आणखी प्रज्वलित करणे, जमिनीवर नाणे ठेवून ते ताशा वाजवणाऱ्याला किंवा ढोल वाजवणाऱ्याला तोंडाने उचलायला लावणे असे प्रकार होत असत. इतरही काही प्रकार होत. बनाटी फिरवणे हा लयबद्ध कवायतीचा प्रकार आहे. ताशा वाजत असताना त्या तालावर बनाटी फिरवली जात असे. कवायत करणाऱ्यांना नंतर मान म्हणून नारळही दिला जात असे. वरातीत नाचून झाल्यानंतर वर-वधूची दृष्ट काढून घरात स्वागत केले जाते आणि मग घरभरणी होते.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हळद उतरण्याच्या प्रसंगी विविध खेळ वर-वधूकडून खेळवले जातात. यामागचा उद्देश हा की त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे आणि नववधूला परके वाटू नये, तिने सासरी समरस व्हावे. मग पाच परतावणे होतात. पूर्वी खरोखरच पाच परतावणे व्हायची. म्हणजे पहिल्या वेळी नवरीला माहेरी घेऊन जायला वधूपक्षाकडची मंडळी येत. तिला परत सासरी आणायला नवऱ्याबरोबर वरपक्षांची मंडळी जात. हा क्रम पाच वेळा होई. प्रत्येक वेळी मंडळींची संख्या कमी होत जाई. परतावणासाठी जाणाऱ्या मंडळींना मानाचा नारळ दिला जाई. प्रत्येकाला मग तो छोटा असो की मोठा नारळ मिळत असे. परतावणावरून परतताना कधी कधी हेच नारळ हातात धरून नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जात असे. पाच परतावणे झाल्यानंतर लग्नसमारंभ संपन्न होऊन नवपरिणीत दांपत्य आपल्या नवीन संसाराला सुरुवात करतात.

कोकणातील लग्नसमारंभाचा हा आठवणीरूपी लेख लिहिताना काही संदर्भ निसटले असतील. पण एकूणच कोकणातील लग्नसमारंभ कोकणात जाऊनच अनुभवयाला हवा. संधी मिळाल्यास अवश्य तो अनुभवा.

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

59 minutes ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago