मुंबई (प्रतिनिधी): ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, २६ मे २०२४ रोजी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान १०.०० ते १५.०० वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक पाळला जाईल.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.
ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही ट्रेनचे आगमन/निर्गमन होणार नाही. यासंदर्भात सविस्तर माहिती व रद्द केलेल्या गाड्यांची यादी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात उपलब्ध असेल. प्रवाशांना विनंती आहे की, कृपया वरील व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करावा.