
जाणून घ्या पर्यायी मार्ग काय असतील
ठाणे : महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. घोडबंदर मार्गावरील मोठ-मोठे खड्डे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गायमुख घाटातील रस्त्यावरील दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आजपासून ६ जूनपर्यंत काही अवजड वाहनांना या मार्गावरुन जाण्याची बंदी घातली आहे. तसेच त्या वाहनांना काही पर्यायी मार्गदेखील उपलब्ध करुन दिले आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे
घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये, या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. एका यंत्राद्वारे ७०० मीटर रस्त्यावर खड्डे खणून तेथे नव्याने खडी टाकली जाणार आहे. त्यानंतर येथे डांबरीकरण केले जाणार आहे. येथील मार्गिका समांतर करण्याचा निर्णय देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. मात्र पावसामुळे हे काम लांबणीवर गेले असल्याची माहिती आहे.
हलक्या वाहनांना परवानगी
अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतुक मार्गावरून सुरू राहील. दुरुस्ती दरम्यान येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे. घोडबंदर घाट मार्ग अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाचवेळी वाहनांचा भार वाढल्यास ठाणे, घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात. पावसाळ्यात पाणी साचल्यास कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल (कालावधी २४ मे ते ६ जून)
- मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवडाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे जातील.
- मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे वाहतुक करतील.
- नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवीकडे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे जातील.
- गुजरात येथून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गे जातील.