Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Pune car accident : 'पोर्शे कार बिघडली होती!' मुलाच्या बचावासाठी अग्रवालांच्या वकिलाचा युक्तिवाद

Pune car accident : 'पोर्शे कार बिघडली होती!' मुलाच्या बचावासाठी अग्रवालांच्या वकिलाचा युक्तिवाद

विशाल अग्रवालांनी बिघाडाबाबत तक्रार देखील केली होती असा वकिलाचा दावा


पुणे : पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Car Accident) राज्यभरात वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणी वेदांतचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर वेदांतलाही १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. न्यायालयात मात्र वेदांतला वाचवण्यासाठी अग्रवालांचे वकील भलताच युक्तिवाद करताना दिसत आहेत. 'जिने धडक दिली ती पोर्शे कार बिघडली होती!', असा दावा वकील करत आहेत. मात्र बिघडलेली कार वडील आपल्या मुलाला का चालवायला देतील? असा साहजिक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. वकील म्हणाले, अपघातापूर्वी कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. या बिघाडासंदर्भात त्यांनी कंपनीशी देखील संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली होती.


एकीकडे कारमध्ये बिघाड असल्याचा युक्तीवाद विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी केला, तर दुसरीकडे विशाल यांचा ड्रायव्हरने मात्र परस्परविरोधी जवाब नोंदवला आहे. मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवायला दे, तू मात्र त्याच्या बाजूला बस, अशी सूचना अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे. जर कारमध्ये बिघाड होता तर ती कार आपल्या पोटच्या मुलाला चालवण्यासाठी कोणते वडील देतील? असा सवाल सध्या सर्वांना पडला आहे. त्यामुळे दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment