Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभक्तांच्या कल्याणा संतांच्या विभूती

भक्तांच्या कल्याणा संतांच्या विभूती

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

किरण कुलकर्णी, पलावा यांना महाराजांचा आलेला सुखद अनुभव. माझ्या आईची गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि ती कुठलीही गोष्ट किंवा कार्य करण्याआधी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय सुरू करत नाही. हे मी बरेच दिवसांपासून बघत होते. आईने मला शेगाव येथून एक छोटी पोथी आणून दिली आणि म्हणाली की, तू कुठेही घराच्या बाहेर पडताना ही पोथी नेहमी सोबत ठेवत जा.

त्याप्रमाणे मी नेहमी बाहेर जाताना पोथी सोबत ठेवत असे. एकदा मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला जाण्याकरिता आम्ही सर्व गाडीने निघालो. खूप रात्र झाली होती. त्यावेळी आम्ही आमची गाडी घेऊन पुण्याला निघालो होतो. त्यावेळी गाडीत आमच्या सोबत मी महाराजांची छोटी पोथी ठेवली होती.

आम्ही एक तासात थोडे पुढे गेलो आणि अचानक आमची गाडी बंद पडली. त्यावेळी पूर्ण रस्त्यावर कोणीही नव्हते. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी बंद झाल्यामुळे काय करावे हे कळतच नव्हते. गाडी घेऊन थोडेच दिवस झाले असल्याने आम्हीही नवीन होतो. काय करावे हे कळत नव्हते. आमच्या सोबत आमची दोन वर्षांची छोटी मुलगी देखील होती. त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. त्यावेळी अचानक माझे लक्ष पोथीकडे गेले आणि मी हात जोडून महाराजांना म्हटलं, महाराज काहीतरी करा पण आम्हाला सुरक्षित घरी पोहोचवा.

तेवढ्यात आम्हाला अचानक त्या रस्त्यावरून एक माणूस येताना दिसला. तो माणूस गाडीवर येत होता. तो आमच्याजवळ येऊन गाडीजवळ थांबला. त्या माणसाने आमची विचारपूस केली. त्याला आमची अडचण समजून गॅरेजवाल्याला फोन करून दोन माणसांना बोलावून घेतले. ती दोन माणसे आली आणि त्यांनी आमच्या गाडीचे पंचर काढून दुरुस्त करून दिली. आम्ही त्यांना धन्यवाद म्हणून तेथून निघालो. पुढे प्रवासात आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. अचानक माझ्या लक्षात आले की, रस्त्यावर कोणीही नसताना अचानक तो माणूस गाडीवरून आला काय आणि त्याने त्या दोन माणसांना बोलावून गाडी दुरुस्त करून आम्हाला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित घरी पोहोचवले. अन्यथा अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर लहानशी मुलगी सोबत काय अवस्था झाली असती आमची? मग का कुणास ठाऊक मला त्यावेळी असे वाटले की, श्री महाराजांनी इथे येऊन आमची मदत केली आणि नकळत मी पोथीकडे बघून हात जोडले.

तेव्हापासून माझी महाराजांवरची श्रद्धा अजूनच दृढ झाली. मी दर गुरुवारी पोथीवाचून गुरुवारी पिठलं- भाकरी महाराजांना आवडणाऱ्या पदार्थाचा नैवेद्य करून दाखवते. माझा हा पहिला अनुभव मी कधीच विसरणार नाही.

भक्तांच्या संकटाच्या वेळी महाराज नेहमीच आपल्यासोबत असतात. ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. त्यामुळे मी दरवेळी कुठेही जाताना महाराजांना सांगते की, महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा. त्याने मला खूप बळ मिळते. अर्थात आईने दिलेली श्री महाराजांची पोथी माझ्याजवळ नेहमी असतेच. जेणेकरून महाराज जवळ असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -