Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदेवाकरिता स्वतःला विसरावे!

देवाकरिता स्वतःला विसरावे!

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

तुम्ही स्वत:ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो; पण ते विषयाकरिता विसरतो. स्वत:ला विसरावे; पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो, हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे.

त्याचप्रमाणे दु:खाची बातमी कळली म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे, हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की, लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना, मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही, असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वत:ची आठवण ठेवून प्रपंच केला, तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.

व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे; पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात, तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरूमध्ये काही नसते? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवील, त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.

तात्पर्य : परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -