माणूस म्हणून जन्माला आलो, हे आपलं भाग्य! तरीही आपल्याला स्वतःची खरी ओळख असते का? नाही. मग हे ‘आत्मज्ञान’ करून देण्याचं कार्य केलं संतमंडळींनी. हे आपलं परमभाग्य. यातील एक महान नाव ‘संत ज्ञानेश्वर.’ भगवद्गीतेतील तत्त्व सामान्यांना शिकवण्यामागे त्यांची केवढी तळमळ! ‘ज्ञानेश्वरी’तून ही शिकवण गेली सातशे पंचवीस वर्षं ते देत आहेत. म्हणून आपण त्यांना म्हणतो ‘माऊली!’ त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील अठराव्या अध्यायातील काही सुंदर ओव्या आपण आज उलगडूया.
ज्ञानी माणूस कोणता? तो कर्म करतो; पण ते मी केलं, असा अभिमान बाळगत नाही. ‘तसा जो कर्मातीत झाला आहे (कर्माच्या पलीकडे गेलेला), त्याची लक्षणे तुला युक्तीचे बाहु उभारून सांगतो.’ ओवी क्र. ४०२.
किती नाट्यपूर्ण ओवी आहे ही! कर्मापासून मुक्त असलेल्या माणसाची लक्षणं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. त्याप्रसंगी ज्ञानदेवांनी लिहिलेली ही ओवी. ‘ही लक्षणं मी तुला सांगतो’ असं म्हणणं खूप गद्य वाटतं. ज्ञानदेवांची प्रतिभा या गद्य, रुक्ष वाटणाऱ्या विधानाला किती सुंदर रूप देते! ‘युक्तीचे बाहू उभारून सांगतो’ यात अर्थपूर्णता तर आहेच. ‘युक्ती सांगतो’ असं समोरच्याने म्हटलं की, आपण खूश होतो. कारण युक्तीने अनेक कठीण गोष्टी सोप्या होतात. इथे ज्ञानदेव म्हणून तो शब्द वापरतात. कारण त्यांना श्रोत्यांचं मन अचूक कळलं आहे. पुन्हा ‘बाहु उभारून’ असं म्हणून त्याला चित्रमय रूप देतात. युद्धात एखाद्या अटीतटीच्या सामन्यात सिद्ध होणं, याची सूचना देणारा शब्दसमूह आहे-‘बाहु उभारून!’ इथे म्हटलं तर अर्जुनाला अशा युद्धासाठी तयार करायचं आहे. त्यासाठी आधी त्याला मानसिक बळ द्यायचं आहे. त्याकरिता प्रथम श्रीकृष्ण सज्ज आहेत. हे सारे अर्थाचे कंगोरे या अशा वर्णनातून आपल्याला उलगडत जातात. ही ओवी अशी –
‘तैसा सोडविला जो आहे। तयाचें रूप आतां पाहें।
उपपत्तीची बाहे। उभऊनि सांगों॥’
ज्याला असं आत्मभान आलं आहे, त्या ज्ञानी माणसाची अवस्था कशी असते? याचं वर्णन करणारी पुढची ओवी ऐकूया..
तो ज्ञानीपूर्वी अज्ञानात जणू घोरत पडला होता. पण ‘तू तेच आहेस’ (सर्वत्र एकपणाने पाहणं) हे महावाक्य कानी पडून, गुरुकृपेच्या बलाने तो जागा झाला आहे. पण कसा जागा झाला आहे? हे सांगताना ज्ञानदेव लिहितात की, ‘नुसता हात ठेवून नव्हे, तर जसा थापटून जागा केला आहे.’ साध्याशा वाटणाऱ्या या हालचालीत किती अर्थ भरलेला आहे! एखादा माणूस झोपलेला असेल, तर त्याला उठवण्यासाठी जागं केलं जातं. त्यासाठी आधी डोक्यावर हात ठेवून प्रयत्न होतो. विशेषतः आईकडून. पण त्यापुढची पायरी म्हणजे थापटून जागा करणं, यात उठवणाऱ्याची माया जाणवते, तळमळ कळते आणि प्रयत्नांची तीव्रता उमगते. थापटून जागं केल्यास, तो माणूस लवकर भानावर येतो. हा अर्थ इथे सांगायचा आहे.
पुन्हा ज्ञानदेवांची लेखनाची एक खास पद्धत आहे. ज्यात ते ‘नाही’ या क्रियापदाचा कल्पक वापर करतात. इथेही ‘थापटून जागा केला आहे’ असं केवळ लिहिता आलं असतं त्यांना. पण ते लिहितात, ‘नुसता हात ठेवून नव्हे’ असं लिहिल्याने पुढील वर्णनाला अधिक खुमारी, रंगत येते. अजून काही ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की, ‘हे मी नाही हो म्हणत’ प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा सांगतो आहे. तिथेही ‘नाही’चा वापर करून, त्यांनी कथन रंगतदार केलं आहे. म्हणूनच अशी ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना तत्त्वज्ञान असूनही आपण त्यात रमून जातो, रंगून जातो, कळत नकळत शिकून जातो.
manisharaorane196@ gmail.com
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…