जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची चातकासारखी वाट पाहत असणाऱ्यांसाठी आनंदाची माहिती मिळत आहे. नैऋत्य मौसमी पाऊस म्हणजे मान्सूनची अनुकूल वातावरणामुळे वेगाने आगेकूच सुरु आहे. दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन झाले असून काही राज्यांत मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. तसेच येत्या काही दिवसांत केरळमध्येही हे नैऋत्य मौसमी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता पाऊसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून लवकरच पावसाचा आनंद घेता येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी आज दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान व निकोबार बेट तसेच अंदमान समुद्राचा भाग व्यापला आहे. नैऋत्येला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच २४ मे पर्यंत ते बंगाल उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार करतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ भागात रेड अलर्ट
या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळला रेड अलर्ट जारी केला असून २५ मे पर्यंत मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल भागांमध्ये २४ मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट
पुढील पाच दिवस वायव्य भारतातील मैदानी भागात तीव्र उष्ण लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पश्चिम-उत्तर मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहणार आहेत. तर हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांच्या भागात तीव्र उष्णता कायम राहणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.