‘या’ दिवशी निकाल होणार जाहीर
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची अपडेट
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) काल बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर करण्यात आला. यावर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली. बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.
नुकतेच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालासंबंधी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचे अभिनंदन करत शिक्षणमंत्र्यांनी दहावीचा निकालाबाबत माहिती दिली.
‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल
दहावीचा निकाल २७ मे पर्यंत लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया २४ तारखेपासून सुरु होत आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते, असं दीपक केसरकर म्हणाले. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस आधीच जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता. मात्र, राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे निकालास विलंब झाला, असं दीपक केसरकर यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कधी होणार बारावीची पुनर्परीक्षा?
१६ जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे. ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले.