निकाल लागताच ती किचनमध्ये गेली…दरवाजा लावला…अन्…
मुंबई : काल ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हाती लागला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून अनेक जण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र, काही विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण न मिळाल्याने व नापास झाल्यामुळे ते हताश झाले. अशातच भाईंदर येथून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भाईंदर पूर्व येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीला अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने कठोर पाऊल उचललं आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची ही मुलगी मालाडच्या एका खासगी महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होती. काल बारावीचा निकाल लागला तेव्हा विद्यार्थिनी थोडी निराश झाली होती. कारण विद्यार्थीनीला ९० टक्के मिळावे अशी अपेक्षा होती मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे या विद्यार्थीनीने मंगळवारी दुपारी किचनमध्ये असलेल्या नायलॉनच्या रश्शीने गळफास घेत आत्महत्या केली.
नेमकं घडलं काय?
बारावीतील या विद्यार्थीनीचा स्वभाव खूप लाघवी होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला बारावीत ९० टक्के मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिला ७८ टक्के मिळाले होते. त्यामुळे ती निराश होती. परीक्षेनंतरही ती थोडी शांतच होती. यासंबंधी तिच्या कुटुंबियांनी चर्चादेखील केली होती. त्यांनी तिला समजावले होते आणि चिंता न करण्याबद्दलही समजावले होते. मात्र निकाल लागताच घरच्यांच्या नकळत ती किचनमध्ये गेली आणि दरवाजा बंद करुन घेतला. नंतर काही वेळातच एका व्यक्तीने किचनमध्ये तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्याने आरडाओरडा करुन परिसरातील नागरिकांना गोळा केले. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला आणि इमारतीतील नागरिकांना या घटनेबद्दल कळले.
दरम्यान, या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.