Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यनेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने काही लोक विनाकारण खोटं बोलताना आपण पाहतो. अगदी किरकोळ गोष्टींपासून ते गंभीर विषयावरसुद्धा लोक बेमालूम खोटं बोलतात. अशाप्रकारे सतत खोटं बोलण्याची सवय अंगवळणी पडलेल्या लोकांच्या वृत्तीला pathological lying असे म्हणतात. खूप लोकांना स्वतःलाच माहिती नसते की, आपण वारंवार खोटं का बोलतोय? कळत-नकळत सुद्धा त्यांच्याकडून खोटे बोलले जाते. अशा लोकांचे हे सेकंड नेचर बनलेले असते. सतत खोटं बोलणारी व्यक्ती असं का करते? एकतर या व्यक्तीला सगळ्यांना वेड्यात काढायचे असते, दिशाभूल करायची असते अथवा ते स्वतः प्रचंड मानसिक तणावात असतात.

Locus of control म्हणजेच आपल्या आयुष्यात आपले जे इंटर्नल आणि एक्सटर्नल बिलीफ असतात त्याची योग्य सांगड न घालता आल्यामुळे खोटं बोलण्याची वृत्ती वाढत असते. इतरांचा ब्रेन वॉश करण्यासाठी अनेकदा व्यक्ती खोटं बोलते. याचं साधं, सोपं उदाहरण द्यायचे झाले तर ज्याप्रमाणे आपण लहान मुलांना सांगतो की, अंधारात जाऊ नको, तिकडे भूत असते. लहान मुलं जेव्हा आपलं न ऐकता अंधारात जातात आणि पडतात, त्याला लागते किंवा ते घाबरत रडायला सुरुवात करते तेव्हा आपण त्याला बोलतो की, मी सांगितलं होतं ना अंधारात भूत असते, त्यामुळेच असं झालं. वास्तविक आपल्याला माहिती असतं की भूत वगैरे काही नाही, पण त्या मुलाच्या मनात मात्र आता कायमचं हे कोरलं जातं की अंधारात भूत आहे. त्यामुळे तिथे जायचं नाही, आपल्याला इजा होते.

स्वतःला एखादी गोष्ट, एखादी परिस्थिती खरी माहिती असून पण ती स्वतःच्या मनाला, बुद्धीला पटत नाही. स्वीकारताना त्रास होतोय अशा वेळी ती गोष्ट आपल्याला हवी तशी बदलून म्हणजेच त्याला खोटं रूप देऊन, वारंवार समोरच्याला सांगितली जाते. अशाप्रकारे कोणतंही खोटं बोलणं परत परत सातत्याने दाखवलं अथवा सांगितलं गेलं की ते लोकांना खरं वाटू लागते आणि खोटं बोलणाऱ्याचे हेतू साध्य होतात.

अनेकदा जास्त खोटं बोलण्याची वृत्ती त्या लोकांमध्ये असते, ज्यांना स्वप्रतिष्ठा अथवा स्वाभिमान, आत्मप्रतिष्ठा कमी आहे (Issue related to self esteem). स्वतःमधील आत्मप्रतिष्ठा भरून काढण्यासाठी अनेकदा लोक खोट्याचा आधार घेतात. यासाठी सर्वसाधारण उदाहरण म्हणजेच जर एखाद्या मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले, तर त्याला स्वतःला अपराधी वाटणार, तो चुकला, त्याला अपेक्षित अभ्यास करून चांगले मार्क मिळवता आले नाही, तो इतरांपेक्षा मागे राहिला, सगळ्यांपासून तो आता वेगळा ठरला, तो नॉर्मल विद्यार्थी नाही, हे त्याला जाणवते म्हणजेच त्याची आत्मप्रतिष्ठा कमी होते. त्याला आयुष्यात जे हवं, जसं सगळ्यांनी मिळवलं ते नाही जमलं. चांगल्या आणि योग्य मार्गाने तो पुढे गेला नाही. अशावेळी हा विद्यार्थी पालकांना, शिक्षकांना किंवा इतरांना हे कधीच कबूल करणार नाही की मी चुकलोय, माझा अभ्यास कमी पडला, तर तो त्याच्या अपयशी असण्याला अनेक कारणे देईल, वेगवेगळ्या लोकांना जबाबदार धरेल. या ठिकाणी तो, त्याचे शिक्षक चांगले नव्हते, क्लास योग्य नव्हता, अभ्यासाला वातावरण बरोबर नव्हते, पालकांनी मार्गदर्शन केले नाही इथपासून ते अगदी प्रत्येक गोष्टीला दोष देईल जे की सर्व खोटं असेल.

अनेकदा ज्या लोकांचे बालपण खूप असुरक्षित परिस्थितीमध्ये गेले आहे, ज्यांना कुटुंबातील लोकांचा सहवास, प्रेम, संस्कार, लक्ष, हवे तसे मिळाले नाही, घरातील लोकांकडून मायेची ऊब, सुरक्षित भावना मिळालेली नाही ते मोठेपणी खोट्याचा आधार घेताना दिसतात. काही लोक बालपणी भोगलेल्या त्रासातून, अपमानातून खूप पुढे जातात, खूप मोठे होतात, प्रगती करतात, विकास करतात, आयुष्याला आकार देतात. लहानपणापासून ज्या चुका त्यांनी कुटुंबात पहिल्या, त्या कधीच परत करत नाहीत, तर उलट स्वतःला योग्य मार्गाने सिद्ध करतात. या उलट काही लोक सतत खोटं बोलून सगळ्यांनी आपल्यावर पहिल्यापासून अन्याय केला, अत्याचार केला, आपला कायम गैरफायदा घेतला गेलाय, फसवणूक केली गेली आहे, याच मानसिक परिस्थितीमध्ये राहून तेच इतरांना पटवून देण्यासाठी सतत खोटं बोलू लागतात जी त्यांची आयुष्यभरासाठी सवय बनते.

अनेकदा व्यक्तीला लहानपणी, तरुणपणी खोटं बोलताना पकडून पण, खोटं बोलतोय लक्षात येऊन देखील घरातले, कुटुंबातले, पालक त्या त्या वेळी कठोर भूमिका घेऊन विरोध करत नाहीत. योग्य त्या वयात योग्य ती समज दिली गेली नाही, खरं किंवा खोटं बोलणं, त्यातील फरक, त्यातून होणारे तोटे, येणाऱ्या अडचणी त्याचवेळी समोरच्याला लक्षात आणून दिल्या तर निश्चित पुढे कोणी चुकीच्या मार्गाने जात नाही. आपण एकुलता एक म्हणून, कुटुंबाचा आधार म्हणून, अथवा लाडका म्हणून ज्यावेळी मुलांना खास वेगळी वागणूक देतो, तेव्हा तो मग मनमानी करण्यासाठी, स्वतःला कायम योग्य आणि खरं सिद्ध करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ लागतो.

लहानपणी जर आपलं खोटं बोलणं वावगं नाही त्यात काही विशेष नाही, काही चूक नाही, अशी मानसिकता तयार झाली की छोट्या-छोट्या कारणांवरून खोटं बोलत बोलत व्यक्ती पुढे इतकी निर्ढावली जाते की त्याला स्वतःच्या कोणत्याच बोलण्याचं काहीच गांभीर्य राहत नाही. जी व्यक्ती स्वतः सतत खोट्याचा आधार घेत आली आहे, ती इतरांचं पण कोणतेही बोलणं गांभीर्याने घेत नाही. अगदी घरातले, जवळचे, नात्यातील लोकं पोटतिडकीने जरी अशा व्यक्तीला सुधारण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न करू लागले तरी ते अपयशी होतात. कालांतराने खोटे बोलण्याच्या सवयीचे कठोर आणि त्रासदायक परिणाम त्या व्यक्तीला तसेच त्याच्याशी संबंधित लोकांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात.

एकदा ठरावीक वयानंतर घरातले म्हणतात, आता तो काही लहान नाही, त्याला त्याचं कळत नाही का, आता आम्ही काय करू शकतो? म्हणून अशा सवयींवर पहिल्याप्रथमच कडक प्रतिक्रिया देणं, वचक ठेवणं आवश्यक असते. अन्यथा पुढे आयुष्यभर ही सवय जात नाही. अनेकदा खोटं बोलणाऱ्या लोकांचा स्वतःवरच विश्वास नसतो. आपल्याला जे जमलं नाही, ज्यात आपण फेल गेलो ते त्यांना स्वीकारणे कठीण असते. स्वतःवरच विश्वास नसल्याने हे लोक इतरांवर पण विश्वास ठेवत नाहीत. एकदा खोटं पचत आहे म्हटल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो आणि ते वारंवार याचाच वापर करून वेळ मारून नेतात. असे लोक कधीही रिअॅलिटीचा म्हणजेच सत्याचा सामना करू शकत नाहीत. स्वतःच्या आयुष्यात अपेक्षित ते काहीही योग्य पद्धतीने मिळवू न शकल्यामुळे आपल्या अपयशाचं खापर ते इतरांबद्दल खोटं बोलून त्यांच्यावर फोडतात. पैसा, यश, कीर्ती, सामाजिक प्रतिष्ठा, नातेसंबंध, वैवाहिक, व्यावसायिक आयुष्य यांमध्ये जे जे बिनसलेले असेल त्या ठिकाणी खोट्याचा आधार घेऊन त्या चुकांना थिगळं लावण्याचा हे लोक प्रयत्न करतात.

सतत खोटे बोलणारे लोक हे इतरांना कधीच शंभर टक्के सत्य समजू नये, याची पुरेपूर काळजी घेतात. अशा लोकांनी स्वतःचीच आभासी दुनिया बनवलेली असते. त्यातच ते रमतात. इतरांसमोर खोटा खेळ रचणारे, त्या खेळाचे नियम ठरवणारे आणि त्या खेळाचे खेळाडू ठरवणारे पण तेच स्वतः असतात. कारण त्यांना खेळाचा निकाल खरं काय, सत्य काय तो नको असतो, तर स्वतःला जसा हवा तसा हवा असतो. खोटं बोलणाऱ्या लोकांमध्ये इतरांना प्रभावित करण्याची, इतरांना आपलं म्हणणं गळी उतरवण्याची कला पुरेपूर अवगत असते. एकाला, दोघांना किंवा एखाद्या समूहाला वेड्यात काढून हे लोक थांबत नाहीत, तर संपूर्ण समाजासमोर आपली खोटी प्रतिमा उत्तम पद्धतीने रचून त्या खोट्या प्रतिमेला खरं समजून बळी पडणारे अनेक जण ते तयार करतात.

आपण अनेकदा बघतो की, समाजात अनेक जण, लोकांची फसवणूक करण्यासाठी, स्वतःची खरी आयडेन्टिटी म्हणजेच ओळख, खरं नाव, खरं काम लपवून वावरतात. अनेक जण तर आपण जे नाही आहोत ते दाखवतात. यासाठी खोटी नाती, खोटी नावं, खोटी कागदपत्रे, खोटे आयडेन्टिटीचे पुरावे, स्वतःची ओळख करून देताना स्वतःची खोटी माहिती सांगणं या पद्धतीसुद्धा वापरतात. या स्तरावर खोट्याचा आधार घेणारे लोकं म्हणजेच खोटं बोलण्यात पूर्णपणे मुरलेले आणि त्याबद्दल त्यांना काहीही न वाटणारे, अत्यंत बेरड असे झालेले असतात. अशा लोकांना खोटी ओळख, खोटे संबंध, खोटी नाती, खोटी परिस्थिती जगासमोर दाखवताना काहीही फरक पडत नसतो. स्वतःचं नाव बदलण्यापासून, स्वतःचे नातेवाईक बदलण्यापर्यंत तर स्वतःच रंग-रूप बदलून, वेषांतर करून जगणारे महाभाग सुद्धा आपल्या समाजात आहेत. खोटे मुखवटे घातलेले असे लोकं कुटुंबासाठी, समाजासाठी अत्यंत घातक असतात तसेच ते स्वतःच्या विनाशाला पण कारणीभूत ठरतात.
अशा प्रकारे खोटी वृत्ती इतक्या शिगेला पोहोचू नये म्हणून खूप लहानपणापासून, तरुण असल्यापासून वेळोवेळी कौटुंबिक संस्कार, नीतिमूल्य यांची अंमलबजावणी होणे गरजेचे असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -