साओ पाउलो : पालकांनी मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागात एका १६ वर्षीय मुलाने संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक घटना ब्राझीलमध्ये उघडकीस आली आहे. या मुलाने आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची कबूली दिली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
इसाक टावरेस सँटोस (५७), त्यांची पत्नी सोलांज अपरेसिडा गोम्स (५०) आणि त्यांची मुलगी लेटिसिया गोम्स सँटोस अशी मृतांची नावे आहेत.
सध्या अटकेत असलेल्या मुलाने ब्राझीलच्या पोलिसांसमोर कबुली दिली आहे की, त्याचे वडील पोलीस अधिकारी होते. त्याने खून करण्यासाठी त्याच्या वडिलांच्या बंदुकीचा वापर केला. त्याने आधी त्याच्या वडिलांना गोळी मारून ठार केले. या घटनेत नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी त्याची बहिणी तेथे आली तेव्हा त्याने तिच्यावरही गोळी झाडली. नंतर आई कामावरून घरी आली तेव्हा तिच्यावरही गोळी झाडली.
ब्राझीलमधील साओ पाउलो येथील विला जग्वारा येथे ते राहत होते. घटनेनंतर मुलाने पोलिसांना बोलावून गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी आज बुधवारी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनेनंतर दोन दिवस मृतदेह घरातच होते. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
आरोपी मुलाने दिलेल्या कबूलीनुसार, पालकांनी त्याचा अपमान केला. त्यामुळे तो रागात होता. शिवाय त्याचा फोनही जप्त केला होता. जो त्याला शालेय कामासाठी आवश्यक होता. त्यामुळे रागाच्या भरात कट रचून त्याने हे खून केले.