Thursday, July 18, 2024
HomeदेशPM Narendra Modi : कोण आहे पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी? स्वतः केला...

PM Narendra Modi : कोण आहे पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी? स्वतः केला खुलासा

केजरीवालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर

पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यात पूर्णपणे मतदान पार पडलं असून देशात दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. शेवटच्या टप्प्यात आलेल्या या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. ‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह पंतप्रधान होतील’, असं ते म्हणाले होते. त्यामुळे मोदींनंतर राजकीय उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित करताना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “माझा उत्तराधिकारी कोणीही नाही. या देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे”. बिहारच्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज तुकडे तुकडे टोळीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. बिहारमधील जंगलराजसाठी त्यांची आघाडी जबाबदार आहे. येथील काही लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. देशातील जनतेने हे सर्व पाहिले आहे. या आघाडीत तीन गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे टोकाचा धर्मवाद, जातीवाद आणि कुटुंबवाद. मात्र, या सर्वांना ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मोठा धक्का बसेल”, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, “बिहारमधील आघाडीच्या नेत्यांना राज्यातील सन्मानाची पर्वा नाही. पंजाबमधील काँग्रेस नेते बिहारच्या लोकांबद्दल द्वेषपूर्ण बोलतात. पण बिहारमध्ये आरजेडी काँग्रेससोबत युती करत आहे. पहिल्यांदा त्यांनी येथून उद्योग आणि व्यवसायांचे स्थलांतर केले. आता ते बिहारच्या कष्टकरी सहकाऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहेत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -