Friday, December 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, वाढलेले वीजदर यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्यांपुढे जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच दहशतवादीही सरकार विरोधात लढा देऊ लागले आहेत. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानविरोधात सूर उमटत असून उघडपणे भारतात सामील होण्याची भाषा बोलली जात आहे. नेमके काय घडतेय पाकव्याप्त काश्मीरमध्ये?

भारतात लोकशाहीच्या मतोत्सवात पाकिस्तानचा मुद्दा वारंवार चर्चिला जात आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानची वाताहत झाली आहे. तिथल्या महागाईने जनतेचे जीणे हराम करून टाकले आहे. भारताविरोधात भावना भडकावून पोट भरत नाही, हे तिथल्या शासनकर्त्यांनाही आता कळून चुकले आहे. दोनशे रुपयांहून अधिक दराने घ्यावे लागत असलेले दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, त्यात कर्जासाठीच्या अटीमुळे देशात वाढवावे लागलेले वीजदर यामुळे सामान्यांपुढे जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच दहशतवाद पोसण्यासाठी पूर्वी करत असलेल्या खर्चावर निर्बंध आल्याने दहशतवादीही तिथल्या सरकारविरोधात लढा द्यायला लागले आहेत.

तालिबानी दहशतवाद्यांचा नंगानाच सुरू आहे. बाॅम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ल्यांना सामोरे जात पाकिस्तानला आता दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची किंमत मोजावी लागते आहे. त्यातच पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडल्यामुळे पाकमधील नागरिकांना आता स्वस्तात मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे पाकिस्तानच्या चलनाला काडीचीही किंमत राहिलेली नाही. परदेशातील गुंतवणूक थांबली आहे. सरकारच्या धोरणामुळे उद्योजक नव्याने जोखीम पत्कारायला तयार नाहीत. संपूर्ण पाकमधील जनता महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईने तसेच वीजबिलातील वाढीमुळे त्रस्त आहे. एकीकडे गेल्या पाच वर्षांमध्ये भारतातील नेते वारंवार पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची भाषा करत असताना पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानविरोधात सूर उमटू लागले आहेत. बंडखोरीची भाषा बोलली जात आहे. काहींनी तर उघडपणे भारतात सामील होण्याची तयारी दाखवली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सध्या युद्धसदृश स्थिती आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराविरुद्ध काश्मिरी जनतेने बंड पुकारले आहे. लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध करत आहेत. संतप्त जनता पाकिस्तानी सैन्याच्या गोळ्यांनाही घाबरत नाही. आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली आहे. त्यात एक उपनिरीक्षक ठार झाला, तर अनेक आंदोलक ठार आणि जखमी झाले. या आंदोलनामुळे पाकिस्तान सरकार हतबल झाले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तिथल्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रपती भवनात तातडीची बैठक बोलावली आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी सर्व संबंधितांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीच्या आवाहनावर हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक चकमक झाली. अनेक भागांमधून हिंसाचाराची विदारक चित्रे समोर आली.

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानविरोधात मोर्चा काढणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या ‘टीटीपी’ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये करमुक्त वीज आणि गहू अनुदानाची मागणी करणाऱ्या आंदोलकांना ‘तेहरिक-ए-तालिबान’ पूर्ण पाठिंबा देत आहे. काश्मिरींना पाकिस्तानी लष्कराविरुद्ध सशस्त्र लढा सुरू करण्याचे आवाहन करताना ‘पाकिस्तानी लष्कराला केवळ ताकदीची भाषा कळते’ असे या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या इम्रान खान यांच्या पक्षानेही पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांची छळवणूक आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि ते अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकव्याप्त काश्मीर चर्चेत आहे.
नुकतेच सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्वीट केले होते की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रात दाखल केलेला प्रस्ताव मागे घेऊन लष्कर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकते.

राजकीय नेते काहीही म्हणत असले, तरी पाकव्याप्त काश्मीर खरेच पाकिस्तानच्या तावडीतून इतक्या सहजासहजी मुक्त होऊ शकते का? प्रस्ताव मागे घेऊन पाकव्याप्त काश्मीर मिळवता आला असता, तर यापूर्वी पाकिस्तानशी झालेल्या युद्धानंतर ते मिळवता आले असते, असे माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर सांगतात. याचा अर्थ त्यातील गुंतागुंत लक्षात घ्यावी. हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमधील आहे. संयुक्त राष्ट्राचा याच्याशी काहीही संबंध नाही. सीमला करारानुसार दोन्ही देशांना हा प्रश्न सोडवावा लागेल. पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्ध आणि तेही भयंकर युद्ध. त्यासाठी आपली क्षमता वाढवावी लागेल. सध्याच्या ताकदीपेक्षा आपल्याला अधिक मजबूत व्हावे लागेल. सध्या भारत सर्वात बलवान आहे. सरकार सक्षम असून कठोर निर्णय घेऊ शकते. भारताचा काही भाग पाकिस्तान आणि चीनने लष्करी बळावर बळकावला होता. लष्करी बळावरच आपण ते परत मिळवू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदेशीर बंधन नाही; परंतु जागतिक बहिष्काराची किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे खरे आहे. पाकिस्तानने भारताचा काही भाग बळकावला आहे हेही खरे; पण तो परत आणण्याचा मार्ग संयुक्त राष्ट्रसंघाला सापडणार नाही. संयुक्त राष्ट्रात गेले तरी १९४७ मध्ये दाखल केलेल्या ठरावात पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी सार्वमत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ते आपल्यासाठी योग्य नाही. बालाकोट एअर स्ट्राईकच्या निमित्ताने आपल्यावर हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर तर देऊच; पण कुरापत काढणाऱ्याला मुळापासून नष्ट करू, असा संकेत आपण दिला आहे. आता आपल्याला दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडण्यापासून रोखायचे आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याने तेथील परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. पहिले लक्ष तिथल्या लोकांवर, विशेषतः खोऱ्यातील लोकांवर द्यायला हवे. कलम ३७० हटवणे फायदेशीर आहे, हे तिथल्या लोकांना समजेल आणि भारत सरकार आणि लष्कर त्यांच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी काम करत आहे, हे लक्षात येईल तेव्हा पुढचा मार्ग आपोआप सुकर होईल.

पाकिस्तानमधील अलीकडील निदर्शने आणि त्या निदर्शनांमधील हिंसक दडपशाही दर्शवते की, पाकिस्तानची या प्रदेशावरील पकड कमी होत आहे. मुझफ्फराबाद आणि रावळकोटमधील स्थानिक लोक आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष याची साक्ष देतात. रावळकोटमध्ये भारतात विलीनीकरणाची मागणी करणारी पोस्टर्स लागली. आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यानंतर पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील संतप्त रहिवाशांनी पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध केला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरवरील पकड गमावत आहे आणि हा मुलुख भारताचा एक भाग बनण्याच्या जवळ जात आहे. दोन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूमुळे येथे निदर्शने झाली. दहा जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली. त्यामुळे काश्मिरींशी पाकिस्तानची पोकळ एकता उघड झाली आहे.

पाकव्याप्त काश्मीर हे सध्या पाकिस्तानसाठी एक दुखणे बनले आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की लोक पाकिस्तानी निमलष्करी दल आणि पोलिसांचा पाठलाग करून मारत आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमध्येही तणाव वाढला आहे. बलुच नेता आणि सामाजिक कार्यकर्ता, आंदोलक मेहरंग बलोच यांनी ग्वादर बंदर शहराच्या कुंपणाला विरोध करण्याची शपथ घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन आणि समुद्र परकीयांच्या स्वाधीन करणार नाही आणि असा कोणताही प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. विकास आणि सुरक्षेच्या नावाखाली ग्वादरला कुंपण घालण्याच्या आणि चीनच्या ताब्यात देण्याच्या योजनेच्या विरोधात आपण रान उठवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. अशा या अशांत परिस्थितीत पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचीही कोंडी झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -