
'या' तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या
नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दिल्लीसुद्धा सध्या प्रचंड उकाड्याने होरपळत असल्याचं दिसून येत आहे. दक्षिण भारतात पावसाने हजेरी लावली असून उत्तरेत मात्र उन्हाचा तडाखा बसला आहे. जर उत्तर भारतात पाऊस पडला नाही तर दिल्लीत पारा ४५ अंशांच्या पुढे जाऊ शकतो, असा हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. याच वाढत्या उष्मघाताचा धसका घेत दिल्ली सरकारने शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.
दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व शाळा प्रमुखांना उन्हाळी सुट्टीसाठी शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. तसेच याबाबत परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ११ मे रोजीच सरकारी शाळा बंद होत्या. मात्र, काही खासगी शाळा सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर दिल्ली सरकारने शाळांमध्ये ११ मे ते ३० जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राजस्थानमध्ये देखील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १४ मे पासून ३० जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावं, असं शिक्षण विभागाने बजावलं आहे. अन्यथा कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेत. तर नोएडामध्ये देखील सुट्ट्यांचे आदेश दिले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.