
यंदा महेश मांजरेकर नाही तर होस्टिंगच्या माध्यमातून 'वेड' लावणार हा 'लयभारी' अभिनेता
मुंबई : हिंदीत सुरु झालेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा एक मोठा चाहतावर्ग मराठीत (Bigg Boss Marathi) देखील आहे. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये बिग बॉस मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं. मराठीत याचे चारही सीझन हिट ठरले. कलाकार, त्यांची भांडणं, त्यांच्यातल्या स्पर्धा या सगळ्यामुळे रंगत आणणारा हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते बिग बॉस परत कधी सुरु होणार याची वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या सीझन ५ ची (Bigg Boss Marathi Season 5) घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे यंदा चारही सीझन गाजवणारे अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सूत्रसंचालन करणार नाहीत. तर सगळ्यांचा लाडका असा लयभारी अभिनेता, अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने वेड लावलं तो रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यंदा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे.
View this post on Instagram
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख हा स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, मराठी मनोरंजनाचा“ BIGG BOSS”सर्वांना ”वेड” लावायला येतोय... "लयभारी” होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!! फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर." बिग बॉस मराठीच्या या प्रोमोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
आता बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अक्षय केळकरने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या गेल्या सीझनचं विजेते पद पटकावले. तसेच मेघा धाडे, शिव ठाकरे, विशाल निकम या कलाकारांनी देखील बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.