नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल १८ लाख लोकांचे सिमकार्ड (SIM cards) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एकाच वेळी तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करणार आहे. या कारवाई अंतर्गत सरकारने काही दिवसापूर्वी देशातील टेलिकॉम कंपनी Jio, Airtel आणि Vi यांना २८ हजार पेक्षा जास्त सिम कार्ड बंद करण्याचे आदेश दिले होते.
देशात दिवसेंदिवस लोकांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे. यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना लाखो सिमकार्ड्सची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाई अंतर्गत सरकार पुढील १५ दिवसांसाठी सिमकार्ड ब्लॉक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डवर या पद्धतीने सरकार नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य सिमकार्ड वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे लोक चुकीच्या कामांसाठी सिम कार्डचा वापर करत असतील तर त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार आहे.