Friday, July 19, 2024
Homeनिवडणूक २०२४राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी राजकीय आरोप-प्रत्यारोप, कुठे मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ, कुठे मतदान यंत्रात बिघाड, कुठे ईव्हीएमची पुजा अशा गदारोळात महाराष्ट्रातील लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले.

राज्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भिवंडी : ४८.८९ टक्के , धुळे : ४८.८१ टक्के, दिंडोरी : ५७.०६ टक्के, कल्याण : ४१.७० टक्के, मुंबई उत्तर : ४६.९१ टक्के, मुंबई उत्तर मध्य : ४७.३२ टक्के , मुंबई उत्तर पूर्व : ४८.६७ टक्के , मुंबई उत्तर पश्चिम : ४९.७९ टक्के, मुंबई दक्षिण : ४४.२२ टक्के , मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के, नाशिक – ५१.१६ टक्के, पालघर- ५४.३२ टक्के, ठाणे – ४५.३८ टक्के इतके मतदान झाले .

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील सहा मतदारसंघांत सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. उपनगरातील काही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरु राहिल्याने लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मानखुर्द , मुलुंड आणि भांडुप येथे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळे आले होते तर मानखुर्द येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आले होती .मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले .

मुलुंड येथील एका मतदान यंत्रातही बिघाड झाला होता, मात्र तत्काळ दुरुस्ती केल्यानंतर तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले. भांडुप खिंडीपाडा परिसरातील मतदान केंद्रावरील विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने मतदान बंद पडले होते. त्यात पारा वाढल्याने उन्हाची चटके बसत असतानाही रांगेत मतदानासाठी तासनतास मतदार रांगेत उभे राहिले. याद्यातील गोंधळामुळे मतदारांना आपली नावे शोधण्यात वेळ गेला. गोरेगाव येथील मतदार केंद्रावर अनेकांची यादीत नावेच नसल्याचे समोर आले होते . दीड – दोन तास नावे शोधण्यातच अनेकांचा वेळ गेला. येथील एका विस्थापित ३२ कुटुंबांबैकी पैकी फक्त चार ते पाच घरांतील व्यक्तींचीच मतदार यादीत नावे आढळली.

उर्वरित अनेकांची यादीत नावे नसल्याने मतदान न करताच घरी परतावे लागले. ही स्थिती इतरही काही मतदारसंघात राहिली. त्यामुळे मतदार केंद्रावर गोंधळ उडाला. घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी, बर्वेनगर, पारशीवाडी, चिरागनगर, माणिकलाल मैदान, जागृती नगर, श्रेयस दामोदर पार्क, अग्निशामक दल पार्कसाईट आणि विक्रोळी पार्कसाईट येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच अनेकांनी सोबत फोन मोबाईल फोन आणला होता. त्यामुळे मतदान करण्यासाठी प्रवेश मिळत नव्हता. फोन ठेवण्यासाठी सुविधा नसल्याने काहीजणांना मतदान न करताच घरी परतावे लागले. उन्हाचा तडाखा त्यात मतदार यंत्रात तांत्रिक बिघाड, याद्यात घोळ, असुविधा, लांबच्या लांब रांगा यामुळे बऱ्याच ठिकाणी मतदारांनी नाराजी व्यक्त केली .

अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान : कपिल पाटील

भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागले. खंडूपाडा बाला कंपाउंड मिलत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या आरोप करण्यात येत होता. भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्याकडे या संबंधित तक्रार गेल्यानंतर त्यांनी स्वतः या मतदान केंद्राला भेट दिली. त्यानंतर संतप्त कपिल पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच उपस्थित पोलिसांना धारेवर धरत एकच गोंधळ घातला. यावेळी मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्याची मागणीही त्यांनी केली आणि मग स्वत:च पुढाकार घेत या मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. परिसरातील अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी यावेळी कपिल पाटील यांनी केल्या आहे. काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. लोकशाही वाचवायला निघालेलेच लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केली आहे.

४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू

लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक, असल्याचं त्यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलेय. त्याशिवाय चार जून रोजी आपण सर्वजण जल्लोष करु. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचलो. राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच भाजपच्या यशाचा बलदंड पाया रचला. भाजपचे कार्यकर्ते अविश्रांत राबल्यामुळे निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालणार आहोत. ४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

उबाठांचे नेहमीचेच रडगाणे : फडणवीस

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

किरकोळ कारणावरुन वाद

कुलाबा येथे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी आमने सामने आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप आणि सेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. कुलाबा येथील म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर प्रकार घडला.

कल्याण-भिवंडीत मतदारांची नावे गायब

निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे, ते या निवडणुकीतही पाहायला मिळाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम मध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहेत. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेमध्ये ८० हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावे गायब झाल्याची दिसून आली. सोमवारी सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचे वोटिंग कार्ड त्यांच्याजवळ होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हते. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -