Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखNarendra Modi : मोदींच्या सभेने मुंबईकरांना जिंकले!

Narendra Modi : मोदींच्या सभेने मुंबईकरांना जिंकले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क मैदानावर झालेली सभा गर्दीच्या दृष्टीने महाविक्रमी होतीच; पण त्यांच्या भाषणाने त्यांनी मुंबईकरांची मने जिंकली. देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला कोणताही पर्याय नाही, हे त्यांच्या निवडणुकीतील झंझावाती प्रचार दौऱ्यांनी सर्वत्र दाखवून दिले आहे. मोदी यांची लोकप्रियता आजही उत्तुंग आहे. २०१४ आणि २०१९ पेक्षाही २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळणार व आजवर भाजपाला जे यश मिळाले, त्याहीपेक्षा विक्रमी संख्यने लोकसभेवर खासदार निवडून येणार, हे त्यांच्या सभा व भाषणांनी स्पष्ट होत आहे. ‘अब की बार ४०० पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ या भाजपाच्या संकल्पात महामुंबईचा वाटा भरीव असेल, असे त्यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी जवळपास दीड डझन सभा महाराष्ट्रात घेतल्या. मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येणार व मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन करणार, असा विश्वास मुंबईच्या सभेने संपूर्ण देशाला दिला आहे.

मोदी यांच्या सभेला व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार, हे अगोदरच जाहीर झाल्याने, मोदींच्या समोर राज ठाकरे काय बोलणार, याचीही मोठी उत्सुकता होती. शिवाजी पार्क मैदान म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा! हे वर्षानुवर्षे समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेची पहिली सभा याच मैदानावर घेतली होती. शिवसेनाप्रमुखांच्या सभांनी या मैदानावर अनेकदा इतिहास घडवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा याच मैदानावरून मिळाल्याच्या अनेक घटना आहेत. राज ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वी मोदी व शहा यांच्यावर सडकून टीका करणारी भाषणे केली होती; पण यावेळेस मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करणार हे सांगण्यासाठी, ते मंचावर हजर होते. मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत, हेही त्यांनी आवर्जून मोदींना सांगितले. अगोदर एकनाथ शिंदे नंतर अजित पवार आणि आता राज ठाकरे भाजपाबरोबर आल्याने महायुतीची ताकद महाराष्ट्रात मजबूत झाली आहे. त्याचा लाभ महायुतीला होईल, तर तेवढा महाआघाडीला तोटा होणार आहे.

मोदींनी आपल्या भाषणातून गेल्या दहा वर्षांतील कामगिरीचा प्रगती अहवाल प्रारंभी सादर केला. मोदी सरकार आल्यापासून मुंबईत व देशात शांतता आहे. दहा वर्षांत दहशतवादी हल्ले किंवा बॉम्बस्फोटाच्या घटना घडलेल्या नाहीत. सकाळी घराबाहेर पडलेला माणून सायंकाळी काम संपवून घरी सुखरूप येईल की नाही, याची पूर्वी शाश्वती नव्हती. संशयास्पद वस्तूला हात लावू नका, तसे आढळले तर लगेचच पोलिसांना कळवा, अशा सूचना पूर्वी सतत ऐकायला मिळत होत्या. आता अशा सूचनाही ऐकायला मिळत नाहीत. मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशभर सुरक्षिततेची भावना जनतेत निर्माण झाली आहे. सुरक्षित जीवन ही मोदी सरकारची गॅरेंटी आहे, असा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व अविभाजित शिवसेनेने युती करून लढविल्या होत्या. निवडणूकपूर्व युती भाजपाबरोबर पण निकालानंतर सत्तेसाठी आघाडी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर, ही उद्धव ठाकरे यांनी बदललेली भूमिका ही जनादेशाच्या विरोधात होती, हे मोदींनी आवर्जून सांगितले. अर्थातच अडीच वर्षांनंतर पक्षात झालेल्या उठावानंतर ठाकरे सरकार कोसळले. हट्टापायी मिळवलेले मुख्यमंत्रीपद गेले व सत्ताही गमवावी लागली. ठाकरे यांनी जनादेशाचा, भाजपाचा व शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विश्वासघात केला, त्याचे परिणाम त्यांना आजही भोगावे लागत आहेत.

सत्तेसाठी व मुख्यमंत्रीपदाच्या लोभासाठी ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केला. पण मुंबईत चालू असलेल्या विकासकामांना ब्रेक लावून, ती ठप्प करण्याचा प्रयत्न केला, ही मुंबईशी प्रतारणा झाली. त्याची काही उदाहरणेच पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून सांगितली. देशातील पहिली बुलेट ट्रेन मोदी सरकारने मुंबईला दिली. पण बुलेट ट्रेनचे काम थांबविण्याचे काम ठाकरे सरकारने केले. मेट्रोचा विस्तार असो की नवी मुंबई विमानतळ त्यातही मोठे अडथळे निर्माण करण्याचे काम ठाकरे सरकारने केले, याचीही त्यांनी त्यांच्या भाषणातून आठवण करून दिली. मुंबई देशाचे आर्थिक शक्ती केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत छोट्या गुंतवणूकधारकांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. याचा लाभ मुंबईकरांना तसेच देशाला होणार आहे. म्हणूनच मुंबईचा विकास व मुंबईत होणारी गुंतवणूक देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

अयोध्येत राम मंदिर कधी उभारले जाईल, असे ठामपणे कुणी सांगत नव्हते. काँग्रेसने राम मंदिराला नेहमीच विरोध केला. जम्मू-काश्मीरला संरक्षक कवच असलेले ‘३७० कलम’ रद्द होऊ शकेल, असे कुणाला वाटले नव्हते. मुस्लीम समाजात असलेली तिहेरी तलाक पद्धत रद्द होऊ शकेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत या तीनही गोष्टी करून दाखवल्या. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांचा सतत अवमान केला, त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी हात मिळवणी करावी, हे मोठे दुर्दैव आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर संविधानात बदल करून दलितांना असलेले आरक्षण मुस्लिमांना देईल, हा मोठा धोका मोदी प्रत्येक सभेत सांगून, हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. महामुंबईच्या वेगवान सर्वांगीण विकासासाठी देशावर मोदी सरकार असणे गरजेचे आहे. महामुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे, हेच मतदारांच्या हिताचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -