- इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
अठराव्या लोकसभेसाठी आज पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांत मतदान होत आहे. मुंबईतील मतदारांचा कौल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सन २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेना व भाजपा युतीचे सर्व सहा उमेदवार मुंबईकरांनी खासदार म्हणून निवडून दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काँग्रेसचा हात धरून निवडणुकीच्या मैदानात आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपाला साथ देत रणांगणात उतरली आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, तर ठाकरे यांचा पक्ष मशाल चिन्हावर कौल मागतो आहे.
मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई अशा सहा मतदारसंघांत ९९ लाख ३८ हजार ६२१ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या पुढे आहे. मुंबईत मतदानाची टक्केवारी ५० टक्केच्या आसपास घुटमळते, हा आजवरचा अनुभव आहे. मुंबईकरांचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने आहे, हे वास्तव आहे. मोदी हेच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, त्यांनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करावी, हीच सर्वसामान्य मुंबईकरांची इच्छा आहे. महायुतीचे उमेदवार कोण आहेत, यापेक्षा आपण मोदींसाठी मतदान करणार आहोत, ही भावना मुंबईकरांची आहे. सुरक्षितता, विकास आणि राजकीय स्थैर्य यांसाठी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार यावे, ही या मागची भूमिका आहे.
राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ४ जूनच्या निकालानंतर केंद्रात भाजपा सरकार नसेल व मोदी हे पंतप्रधान नसतील, असे अनेकदा भाकीत वर्तवले असले तरी सामान्य जनता, मध्यमवर्गीय, उद्योजक, व्यापारी व व्यावसायीक यांना आजही देशाचे नेते म्हणून मोदीच हवेत. मोदी नकोत या भावनेतूनच भाजपाविरोधी इंडिया नामक आघाडी देशात स्थापन झाली. इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपाच्या तंबूत सटकल्याने, इंडियाला पहिल्या सहा महिन्यांतच अपशकून झाला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा सुरू झाला, तरी इंडिया आघाडीचा नेता कोण, विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमदेवार कोण, इंडियाचा निमंत्रक कोण हे आघाडीतील २६ राजकीय पक्षांना अजून ठरवता आलेले नाही. इंडिया आघाडी म्हणजे सत्ता गमावलेले राजकीय पक्ष व स्वत:च्या राज्याबाहेर ज्यांना स्थान नाही, असे राजकीय नेते यांची कशी तरी बांधलेली मोट आहे. म्हणूनच मोदी सभेला आले की, समोर जमलेली हजारो- लाखोंची गर्दी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा करू लागते. मोदींची लोकप्रियता व करिष्मा देशात उत्तुंग आहे, त्यांच्या जवळपासही कोणी दुसरा नेता नाही, हे इंडिया आघाडीच्या नेत्यांना चांगले कळते. पण मोदींच्या विरोधात भाषणे केली नाहीत व हात पाय मारले नाहीत, तर आपले पुढे काय होणार, हीच त्यांना मोठी भीती आहे.
मुंबईच्या मतदानाकडे सर्व देशाचे लक्ष आहे. विरोधकांची महाआघाडी सत्ताधारी महायुतीला टक्कर कशी देणार, हा मोठा कळीचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की, “राज्यातील सर्व ४८ जागांवर महाआघाडीचे उमेदवार निवडून येणार.” अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्रात आघाडीचे ४६ खासदार निवडून येतात असे सांगतात. राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक. ते एकमेव नेते आहेत की देशभर फिरतात. विरोधी पक्षांकडून त्यांनाच सर्वाधिक मागणी असते. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे ४८ जागा आहे. मग राहुल गांधी महाराष्ट्रात किती वेळा आले? महाआघाडीची सारी मदार ही उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत फारसे स्थान नाही. त्यामुळे उद्धव यांनाच मशाल हाती घेऊन, महामुंबईत फिरावे लागले. आता उद्धव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नाही, राज्याची सत्ता नाही, महापालिकेची मुदत संपल्यामुळे तिथली शक्ती नाही म्हणून दोन्ही हात पसरून आणि वर करून ते मते मागताना दिसत होते. काँग्रेस पक्षाला प्रदेश पातळीवर किंवा मुंबईत सर्वमान्य नेताच नाही. त्यामुळे महाआघाडीच्या प्रचारात कुठे ऊर्जा दिसलीच नाही.
मोदींनी महाराष्ट्रात जवळपास २० प्रचारसभा घेऊन, भाजपाचा पाया भक्कम केला. देवेंद्र फडणवीस यांनी ५२ दिवसांत ११५ सभा घेतल्या, ६७ मुलाखती देऊन महाराष्ट्र ढवळून काढला. आपला उमेदवार कुठे अडचणीत असेल, तर तिथे देवेंद्र स्वत: गेले व त्याला दिलासा देण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, परराष्ट्रमंत्री जयशंकर, भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री, पदाधिकारी अशी पक्षाच्या दिग्गजांची फळी भाजपाने प्रचारात उतरवली होती. एकनाथ शिंदे यांनीही प्रचार दौऱ्यातून महाराष्ट्र पिंजून काढला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मतदान संपल्यावर मुंबईत भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केला. दुसरीकडे महाआघाडीकडे कुलाब्यापासून ठाणे, कल्याण-पालघर-भिवंडीपर्यंत प्रचाराला वाहून घेणारे व दौरे करणारे नेते शोधावे लागत होते.
सन २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा झंझावात होता. त्यांना विरोध करण्याची कुवत व क्षमता विरोधी पक्षात नव्हती. त्या दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. आता तर ‘अब की बार ४०० पार’चा संकल्प सोडला आहे. भाजपाचे ३७० खासदार निवडून आणण्याचा मोदी- शहा-नड्डा यांनी चंग बांधला आहे. यंदा भाजपाच्या निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या नवा विक्रम करेल, असे मोदी छातीठोकपणे सांगत आहेत. मोदी-शहा- नड्डा यांचा जबर आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक सभेतून, भाषणातून नि मुलाखतीतून दिसतो आहे. निदान त्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी बोध घ्यायला हवा होता. यंदाच्या निवडणुकीत मोदींच्या विरोधात आघाडीच्या मंचावर जोरदार भाषणे होत आहेत. फडणवीस यांना टरबूज किंवा फडतूणवीस आणि शिंदे यांना दाढीवाले माकड म्हणून हिणवण्यापर्यंत विरोधकांनी प्रचाराची पातळी गाठली आहे. महाराष्ट्राला हे सर्व लज्जास्पद आहे. सत्ता गेली म्हणून नैराश्य येणे स्वाभाविक आहे; पण दुसऱ्यावर टीका करताना तोल जातोय याकडे लोकांचे लक्ष आहे. माझा पक्ष चोरला, माझे धनुष्यबाण चोरले, माझा बाप चोरला, हे रडगाणे निवडणूक प्रचारात सतत ऐकायला मिळत होते. दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे हे हिंदुत्व व शिवसेनाप्रमुखांचे विचार जपण्यासाठी आम्ही उठाव केला, असे सांगत आहेत. भाजपाने मुंबईतील सर्व तिन्ही मावळत्या खासदारांना उमेदवारी नाकारली व नवे चेहरे दिले. सर्वप्रथम पीयूष गोयल व मिहीर कोटेजा यांची उमेदवारी जाहीर केली. अॅड. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी सर्वात शेवटी म्हणजे चाळीस दिवसांनी जाहीर केली. उमेदवारी देताना मुंबईतील मराठी कार्यकर्ता सापडला नाही का, अशी चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवारही बऱ्याच उशिरा जाहीर झाले. शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपाकडून एनओसी मिळायला विलंब झाला का? मुंबईतील काही उमेदवार हे ईडीच्या रडारवर आहेत, त्यांना आता सुरक्षा कवच मिळाले का? मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे तरूण व कार्यक्षम नेतृत्व आहे. त्यांच्या सामाजिक कामाची यादी मोठी आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब का लागावा? यंदाच्या निवडणुकीत मोदींचा द्वेष करणाऱ्यांचे भविष्य काय आणि महामुंबईतील मतदारांचा विश्वास धनुष्य बाणावर की मशालीवर या दोन प्रश्नांची उत्तरे ४ जूनला मतमोजणीनंतर मिळणार आहेत.
राज ठाकरे यांचे इंजिन या निवडणुकीत महायुतीच्या गाडीला जोडले गेले म्हणून महायुतीला मोठी ऊर्जा मिळाली आहे. त्यांनी मुंबईकरांच्या पाच मागण्या पंतप्रधानांसमोर जाहीरपणे मांडल्या, याचे मुंबईकरांना मोठे समाधान आहे. मुंबई, मराठी अस्मिता व हिंदुत्व हा आपला अजेंडा असल्याचे राज यांनी शिवतीर्थावर दाखवून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सभेसाठी दादरला आले, तेव्हा त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेलाही त्यांनी वंदन केले. शिवतीर्थावर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळापुढे जाऊन ते नतमस्तक झाले म्हणूनच मुंबईकरांना आपल्या दैवतांना विनम्र भावाने वंदन करणाऱ्या नरेंद्र मोदींविषयी मोठा आदर वाटतो. मुंबईकर हे मोदींबरोबर आहेत…
मोदींच्या सभेनंतर शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. त्या म्हणतात की, “राजसाहेबांनी खात्री बाळगली आहे की, मोदीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मागण्या त्यांच्यापुढे त्यांनी मांडल्या. मी सर्व मतदारांना विनंती करीन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक इच्छा व्यक्त केली होती, मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करीन. बाळासाहेबांची इच्छा मतदारांनी पूर्ण करावी…