मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागा आणि महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान सुरू झाले आहे.या टप्प्यात राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह चार केंद्रीय मंत्र्यांच्या नशीबाचा फैसला होणार आहे.
राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मुंबईच्या सहा जागांसह राज्यात एकूण मिळून १३ जागांवर मतदान होत आहे. आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान होत आहे.
पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार
राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अभिनेता भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल किर्तीकर, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे यांच्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार आपल्या मतधिकाराचा वापर करतील. एकूण ९४३७२ मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. यावेळी ९.४७ लाख मतदान अधिकारी ही मतप्रक्रिया पार पडतील.
अक्षय कुमार, अनिल अंबानी यांनी केले मतदान
भारताची नागरिकता मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी विकसित आणि मजबूत भारत हवा आहे. त्यासाठी मतदान केल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अनिल अंबानी यांनी रांगेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला.