दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई
नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही घटनांमध्ये तर पैसे मोजून मोजून मशीन्स थकल्या इतकी रोकड सापडली. आयकर विभाग (Income Tax Department) अशा सुगावा लागलेल्या ठिकाणी तात्काळ छापे टाकून ही रोकड जप्त करते. मात्र, तरीही पुन्हा पुन्हा अशा घटना समोर येतच आहेत. त्यातच आता दिल्लीत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चक्क चप्पल व्यापारांच्या दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकत १०० कोटींची रोकड ताब्यात घेतली आहे .
दिल्लीत आयकर विभागाने शनिवारी म्हणजेच १८ मे रोजी मोठी धाड टाकली. १४ ठिकाणी झालेल्या छापेमारीत जवळपास १०० कोटींची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त केली आहेत. पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये ही रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने सापडले.
आग्रा, लखनौ, कानपूर आणि नोएडा येथील अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी आणि पोलिसांसह आयकर पथकाने शनिवारी सकाळी ११ वाजता एमजी रोडचे बीके शूज, धाकरनचे मनशुफूटवेअर आणि हिंग मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सच्या ठिकाणी छापे मारले. बीके शूज आणि मनशु फूटवेअरने करचुकवेगिरी केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले.
या छापेमारीतून आयकर विभागाने आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त केली आहेत. तसेच, फक्त दुकानातच नव्हे तर मालकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. जवळपास ४२ तासांहून अधिक काळ ही छापेमारी सुरू होती.
रात्रभर सुरु होतं रोकड मोजण्याचं काम
आयकर विभागाने कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डुंग यांच्या जयपूर निवासस्थानातून या टीमला बेड, गाद्या, कपाट, शू बॉक्स, पिशव्या आणि भिंतींमध्ये भरलेले ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले होते. गोविंद नगर येथील रामनाथ डांग यांच्या घरीही ४० कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. ही रोकड मोजण्याचं काम रात्रभर सुरू होतं.