Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीSushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे...

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान

मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show) प्रसिद्धी मिळवलेला मॉडेल आणि गायक सुशांत दिवगीकरच्या (Sushant Divgikar) घरात शनिवारी रात्री आग लागली. सुशांतच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. काही क्षणांत आग पसरल्याने घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने सुशांत व त्याचे कुटुंबिय सुखरुप आहेत. आगीच्या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

सुशांत दिवगीकरच्या घरातील या स्फोटाबाबत त्याच्या मॅनेजरने माहिती दिली. त्याने सांगितले की, “घरातील हॉलमध्ये सगळे जण शनिवारी रात्री जेवण करत असताना एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. मग लगेचच ही आग स्वयंपाकघरात आणि ऑफिसमध्ये पसरली. या घटनेत अवॉर्ड्स, घरातील काही उपकरणं, फर्निचर आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले आहेत,” असं मॅनेजरने सांगितलं.

“घरातील बरंच सामान जळालं आहे, सुशांतचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. सुशांत सध्या त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे, घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही,” अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने दिली.

सुशांत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अभिनेत्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सुशांत जुलै २०१४ मध्ये मिस्टर गे इंडियाचा विजेता ठरला होता. मग त्याने मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच त्याच्या पुरुष व महिला अशा दोन्ही आवाजांतील गायकीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दोन आवाजात गायलेलं ‘अप्सरा आली’ हे मराठी गाणं चाहत्यांना विशेष आवडतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -