Thursday, September 25, 2025

Cartoon characters : आपली मुलं कार्टून्सच्या माध्यमातून काय पाहताहेत?

Cartoon characters : आपली मुलं कार्टून्सच्या माध्यमातून काय पाहताहेत?
  • आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू

पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने कार्टून्स फक्त दृक् स्वरूपात न राहता, दृक्-श्राव्य स्वरूपात मुलांसमोर आल्याने गतिमान, आभासी जग मुलांसाठी खुलं झालं. ऑडिओ- व्हिज्युअल कार्टून्स मुलांच्या मनावर अधिक परिणाम करतात. त्यामुळे मुलांनी किती तास कार्टून पाहायला द्यायचे याचे नियोजन पालकांनी केले पाहिजे.

फार पूर्वीपासून छोट्या छोट्या पुस्तकांतून, मॅगझिन किंवा अगदी वर्तमानपत्रांतून लहान मुलांकरिता दृक् म्हणजेच छापील स्वरूपात कार्टून्स रेखाटली जातात. काही काल्पनिक कॅरेक्टर्स तयार केली जातात. मुला-मुलींना साहसी, जादू करणारे, सुंदर दिसणारी, पराक्रमी कॅरेक्टर्स आणि त्यांच्या कथा मनापासून आवडतात. मनोरंजन हाच कार्टून्सचा पूर्वी मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने कार्टून्स फक्त दृक् स्वरूपात न राहता, जेव्हा दृक्-श्राव्य स्वरूपात मुलांसमोर आली, तेव्हा एक अगदी नवीन, आकर्षक, गतिमान आणि आभासी जग मुलांसाठी खुलं झालं. चंपक, चांदोबा, चिंटू, टॉम अँड जेरी यांतून मुलं छोटा भीम, कृष्ण, राम, विक्रम-वेताळ, बालगणेश यांच्याकडे वळली. अगदी रामायण-महाभारत, गणपती यातील कथादेखील मुलं कार्टून्सच्या, ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहत होती आणि खूश होत होती. आनंद लुटत होती. मनोरंजन खूप छान होत होतं; पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेगाचं, रंगीबेरंगी जगाचं आकर्षण आहे आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या कार्टून्सचे विषय, तंत्रज्ञान पूर्णपणे बदललंय.

खरं म्हणजे कार्टून्सचा उपयोग मुलांसाठी करताना निखळ मनोरंजन असा हवाच; पण त्याचबरोबर मुलांना भौमितिक आकार, रंग, गणिती बैजिक क्रिया, भूगोल, नकाशे, स्थाने, पोशाख, संस्कृती, परंपरा, नृत्य, नाट्य, ऐतिहासिक, पौराणिक प्रसंग यांसाठी तसेच वैज्ञानिक, नवनवीन शोध याकरिता करणं हे खूप उपयुक्त ठरतं. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, लॉजिक आणि रिझनिंग ॲबिलिटी, दृक्-श्राव्य प्रक्रिया, भाषाविकास, नवनिर्मिती यांसाठीही कार्टून्सचा उपयोग छान करता येतो.

कारण नुसत्या प्रिंट मीडियापेक्षा ऑडिओ-व्हिज्युअल कार्टून्स मुलांच्या मनावर अधिक परिणाम करत असतात. आताच्या काळात दाखविली जाणारी किंवा उपलब्ध असणाऱ्या कार्टून्समधील वातावरण, त्यातील कॅरेक्टर्स, त्यांचं बोलणं, सवयी, शब्दप्रयोग याचा डायरेक्ट परिणाम मुलांवर होतो, कारण रोज ते पाहिलं जातं. मुलं ती भाषा, ते शब्द नकळत वापरायला लागतात. त्यांच्या वागण्यात आक्रमकपणा येतोय. मुलं अशी का वागतात, कारण हे सारं चाललंय, ते उद्धटपणे बोलणं लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, इतरांना घाबरवण्यासाठी, इंप्रेशन मारण्यासाठी असं निरीक्षण सांगतंय. यातूनच मुलांचं वागणं अनसोशल म्हणजेच असामाजिक होत जातंय. मुलांना आता हाणामारीचं (violence)चं आकर्षण वाटतंय. निर्माणापेक्षा संहार होणं जास्त आवडतंय. पराक्रम आणि आक्रमण यातील फरक समजेनासा झालाय. सततच्या मारामाऱ्या पाहून कुणाला लागतं, दुखतं, वेदना, जखमा होतात, ही जाणीव बोथट होत चालल्याने संवेदनशीलता, इमोशनल कोशंट कमी होतोय, एम्पॅथॅटिक दृष्टिकोन, सहानुभूतीपूर्वक विचार हेही दुर्लक्षित होत आहे. मुलांसमोर बॅड रोल मॉडेल येत आहेत. मुलं टी.व्ही., टॅबसमोर बसून लोळून तासन््तास कार्टून्स पाहताना वेफर्स, कुरकुरे आणि अन्य स्नॅक्स खात राहतात. त्यामुळे लठ्ठपणा, हेल्थ प्रॉब्लेम वाढताना दिसत आहेत.

याकरिता पालकांना काय करता येईल?

  • आपल्या मुलांबरोबर अधूनमधून तुम्हीही बसा की, मुलं काय पाहताहेत?
  • त्यातील कॅरेक्टर्स, प्रसंगांना कसा प्रतिसाद देत आहेत? कोणत्या प्रसंगात कोणत्या भावना व्यक्त करताहेत? त्यांच्या रिऍक्शन्सचं निरीक्षण करा.
  • मुलांच्या कार्टून्स पाहण्याचे तास ठरवून घ्या.
  • मुलांसाठी आवर्जून मैदानी खेळांचा आग्रह धरा. त्यांची शारीरिक दमणूक आणि व्यायाम खूप जास्त आवश्यक आहे. कारण त्यातून मुलांचे मन आणि शरीर आनंदी, समाधानी राहील.
  • मुलांशी कार्टून्सचं आभासी जग आणि वास्तव जग यातील फरकाबद्दल बोला.
  • टी.व्ही.समोर बसून खाऊ देऊ नका आणि स्वतःही तसं करू नका.
  • माहिती, नवनिर्मिती, मनोरंजनाचे चॅनेल्स शोधा. लहान मुलांसाठीची वर्तमानपत्रे, ‘वयम्’सारखी
  • मासिके वाचायची सवय लावा.
  • अखेरीस कोणतेही माध्यम वाईट नसतं. आपण त्याचा उपयोग कसा करतो आणि इथे तर आपली मुलं त्याचे प्रेक्षक आहेत आणि मुलांच्या कोवळ्या मनावर त्याचा चांगला-वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच त्यांच्या सकारात्मक आयुष्यासाठी जबाबदारीने रिमोट वापरा.
Comments
Add Comment