Saturday, July 5, 2025

Travel : प्रवास...

Travel : प्रवास...

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे


प्रवास...
कुठून सुरू होतो...
कुठे संपतो...!
कसा सुरू होतो...
कसा संपतो...!!
जीवनाचा पहिला प्रवास मातेच्या उदरातून सुरू होतो... नऊ महिन्यांचा असतो हा प्रवास... एवढासा असलेला जीव... हसत्या खेळत्या बाळात रूपांतरित होतो... जन्माला येतो पण त्याला कधीच आठवत नाही, हा नऊ महिन्यांचा प्रवास... त्याला जन्म देणाऱ्या आईला मात्र कायम लक्षात असतो... बाळाचा जन्म... आईचा पुनर्जन्म!!



जन्मापासून...
मृत्यूपर्यंतचा...
बालपणापासून...
वार्धक्यापर्यंतचा...
प्रवास आयुष्याचा!
अनेक घटना, अनेक अनुभव, सुख दुःखाचे चढ-उतार, कष्ट अशा अनेक प्रसंगाना सामोरं जात, आयुष्य पुढे सरकत जातं. हा प्रवास कधी सुखकर, क्लेशदायक ही असतो. ठेच लागत, तर कधी ठोकरा खात, त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळत जाते. कधी फुलांचा वर्षाव, कधी पायघड्या, कधी बोचणारे काट्यातसुद्धा प्रवास सुरू राहतो... अव्याहत... मानवी जीवनाच्या आयुष्याचा!!



मानवाच्या जीवनात त्याच्या शरीरातील अवयवांचा देखील प्रवास सुरू असतो. नवजात शिशूच्या कोवळेपणापासून वाढत्या वयाबरोबर जीर्ण होतं जाणाऱ्या शरीराचा... त्यातील थकून क्षीण होत जाणाऱ्या अवयवांचा प्रवास! अगदी डोक्यावरील केसांपासून पायाच्या नखापर्यंत... आधी तेजीने काम करणारा उत्स्फूर्त मेंदू हळूहळू शिथिल होत जातो... डोळे कमजोर होत जातात... आयुष्याचं गणित सोडवता सोडवता क्षीणत जातात!!



हृदयाचं मशीन तर चोवीस तास चालूच असतं... कोमल हृदयापासून प्रवास वयाप्रमाणे कमजोर होत जातो... अनेक घाव... अनेक प्रहार झेलत याचा अथक प्रवास चालू असतो... पण हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी मात्र काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे... नको असलेले प्रवासी उतरवून द्यावे लागतात... सुखकर होण्यासाठी! मनाच्या प्रवासाचं तर काही विचारूच नका... नुसतं धावत असतं, या ठिकाणाहून त्या ठिकाणी... क्षणात इथे तर क्षणात तिथे! इतका प्रवास करून, हे थकतं पण याचा वेग कमी होत नाही... हे कुठेही पोहोचतं... जिथे कोणी पोहोचू शकत नाही!!



आयुष्याच्या प्रवासात जेव्हा मेंदू, हृदय, मन यांचा प्रवास क्षीण होऊ नये, यासाठी सुरू करावा लागतो आध्यात्मिक प्रवास...पहिली गाडी मिळायला वेळ लागतो... नंतर आध्यात्मिक प्रवासाचा वेग आपोआप वाढत जातो व सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश जीवनाच्या प्रवासात होतो व खडतर असलेला प्रवास सुकर होत जातो! बाह्यरूपी प्रवास म्हणजे शैक्षणिक प्रवास, अनेक तडजोडी, कर्तव्यपूर्तीचा प्रवास... या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अवस्था आहेत, जीवनाच्या गाडीत कित्येक स्टेशनवर समस्या चढतात... दोन स्टेशननंतर उतरूनही जातात... त्यांचा प्रवास तेवढाच!! आनंदाचे सामानही या प्रवासात सोबत असतंच... त्यामुळे समस्यांवर मात करून, जीवनाचा प्रवास सुखद करण्यास नक्कीच मदत होते...



जिंदगी के सफर मे गुजर जाते है वो मकाम...
वो फिर नही आते...
वो... फिर... नही आते!!!

Comments
Add Comment