Monday, July 8, 2024

आपला माणूस

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

नाते कोणतेही असो बहीण-भावाचे, प्रेयसी-प्रियकराचे, नवरा-बायकोचे, आई-मुलांचे. जर आपण या नात्यात एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही, तर ते नाते कमजोर होऊ लागते. यासाठी जेव्हा -केव्हा शक्य असेल, तेव्हा आपल्या माणसांना भेटले पाहिजे. आपण त्या व्यक्तीचे कोणी तरी आहोत, ‘आपला माणूस’ कोण आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.

गोष्टी छोट्या असतात. आपण उगाचच त्याला बडाचढाकर सांगतो किंवा समजतो. चला या बाबतीतील एक छोटीशी घटना सांगते. नवऱ्याला ऑफिसमधून येण्यासाठी खूप उशीर व्हायचा. बायको वाट बघून कंटाळायची.

आल्यावर त्याच्यावर उशिरा येण्याबद्दल चिडायची. दोघांचेही वय साधारण पंचावन्नच्या पुढेच. पन्नासाव्या वर्षी बायकोने व्हीआरएस घेतलेले होते. नवरा मात्र कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पोस्टवर होता. काहीही झाले तरी त्याला रोजच लवकर निघणे होत नव्हते. मुले मोठी झाली होती. शिक्षणासाठी मुंबई सोडून, परदेशात गेली होती. ही बाई खूप कंटाळायची. तिची दिवसभराची चिडचिड, तो आल्यावर भांडणाद्वारे व्यक्त व्हायची. रोजच्या भांडणाला तो कंटाळला आणि अधिक वेळ काढत उशिरा येऊ लागला. त्याला वाटायचे की, ती जागी असली की, आपल्याशी भांडते, त्याऐवजी ती झोपल्यावर आपण पोहोचलो, तर जास्त बरं. मग एके दिवशी तिची बहीण तिच्या घरी आली. अस्वस्थ मनोवस्थेत तिने तिला सर्व सांगितले. बहिणीने समजून घेतले आणि म्हणाली, “तू रिकामीच असतेस ना… कंटाळतेस ना… मग एक छोटसं काम कर ना. त्याला ऑफिसमध्ये पोहोचवायला आणि आणायला तू जात जा म्हणजे अर्ध्या तासाभराच्या अंतरावर असलेले त्याचे ऑफिस. तुझ्या जाण्या-येण्यात एक एक तास जाईल आणि तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या सोबतीचे काही क्षण मिळतील. तिने विचार केला की, अगदी जाता-येता तर शक्य नाही होणार, परंतु ऑफिस सुटल्यावर मात्र आपल्याला त्याच्या ऑफिसला पोहोचता येईल. तोही दिवसभराच्या ऑफिसनंतर थकलेला किंवा स्ट्रेसमध्ये असेल, तेव्हा अगदी ऑफिसच्या पायरीपासूनच त्याचे स्ट्रेस आपल्याला कमी करता येईल. मग बहिणीचा सल्ला मानून, तिने त्याला विचारले की, “मी तुम्हाला ऑफिसमध्ये घ्यायला येऊ का?”

त्याला खूप जास्त आनंद झाला. मग काय अगदी प्रेमिक असल्यासारखे तिने खाण्याचे डबे भरणे, त्याला आवडत असलेला ज्यूस भरून घेणे असे करून, ती त्याला ऑफिसला आणायला जाऊ लागली. तो खूपच भुकेलेला असायचा. त्यामुळे त्याला तासभर आधीच घरचा डबा मिळू लागला. तो छान डबा खात बसायचा आणि ती गाडी चालवायची. त्याला दिवसभरातल्या घटना ऐकवायची. अशा तऱ्हेने दोघांनाही आनंद मिळू लागला. आता ही कथा सांगण्याचे कारण काय की, प्रत्येक समस्येला एक तरी उपाय असतोच! त्यामुळे आपण सगळे पर्याय आजमावून बघायला काय हरकत आहे? नाते कोणतेही असो बहीण-भावाचे, प्रेयसी-प्रियकराचे, नवरा-बायकोचे, आई- मुलांचे, मित्र-मैत्रिणीचे. जर आपण या नात्यात एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही, तर ते नाते कमजोर होऊ लागते. अगदीच तुटते असे म्हणता येणार नाही, परंतु जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा कोणत्याही प्रकारची मदत त्या नात्यातल्या व्यक्तीकडून हवी असेल, तर ती मागता येत नाही. इतका दुरावा निर्माण झालेला असतो किंवा मदतीच्या वेळेस आपण त्यांची आठवण केली, तर त्यांच्या लक्षात येतं की, केवळ दुर्धर प्रसंग आला आहे म्हणून आपली आठवण केली आहे.

अशा वेळेस आपली सगळी कामे सोडून आपला वेळ देऊन किंवा पैसा खर्च करून समोरचा माणूस आपल्यापर्यंत धावत येऊन पोहोचेलच, याची खात्री देता येत नाही. यासाठी जेव्हा केव्हा शक्य असेल, तेव्हा आपल्या माणसांना भेटले पाहिजे. न भेटण्याची अनेक कारणे असतात; पण भेटण्यासाठी मनाची इच्छा असावी लागते. त्यामुळे भेट खरोखर अशक्य असेल, तर आपण अनेक सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारे संपर्कात राहू शकतो. आपण त्या व्यक्तीचे कोणी तरी आहोत, याची जाणीव त्याला अधूनमधून होत राहिली पाहिजे. खरं तर मला असे म्हणायचे आहे की, ‘आपला माणूस’ कोण आहे, याची जाणीव आपल्या स्वतःला व्हायला नको का?

चला तर उचला पेन, लिहा एखादे पत्र. उचला फोन करा, मेसेज किंवा सरळ निघा आपल्या माणसाला भेटायला. बघा त्याला किती आनंद होतो ते…

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -