Thursday, July 25, 2024

Save water : पाणी

  • कथा : रमेश तांबे

एप्रिल-मे महिन्यात सगळीकडेच पाणीटंचाईची भीषण समस्या असते. यावेळी जंगलातील प्राणी-पक्षी पाण्यावाचून कासावीस झालेले असतात. माणसाने आपल्या हव्यासापोटी झाडे, जंगले तर नष्ट केली. पण आपल्याबरोबरच त्याने प्राणी-पक्ष्यांचा विचारसुद्धा केला नाही. त्याच माणसांसाठी कथेमधून तहानलेल्या चिमणीने झाडे लावण्याचा संदेश दिला आहे.

एप्रिल-मेचे अतिशय कडक उन्हाचे दिवस. सगळीकडेच पाण्याची भीषण टंचाई जाणवत होती. जंगलातील प्राणी-पक्षी पाण्यावाचून कासावीस झाले होते. काहींनी तर मानवी वस्त्यांकडे धाव घेतली. अशाच एका जंगलात एक चिमणी आपल्या मुलाबाळांसह राहत होती. तीही पाणी शोधता शोधता रोज दमून जायची. मग एकदा चिमणी नदीकडे गेली आणि म्हणाली,
नदी नदी पाणी दे
मदतीचा हात दे
दोन थेंब पाणी घेईन
मुलाबाळांची तहान भागवीन!
मग नदी म्हणाली,
मी तर गेले अगदी सुकून
आलाच नाही पाऊस अजून
कशी देऊ तुला पाणी
याला जबाबदार माणूस प्राणी!
चिमणी निराश झाली पण हरली नाही. ती पुन्हा उडाली आणि गेली विहिरीकडे आणि म्हणाली,
विहिरी विहिरी पाणी दे
मदतीचा हात दे
दोन थेंब पाणी घेईन
मुलाबाळांची तहान भागवीन!
मग विहीर म्हणाली,
मी तर गेले अगदी सुकून
आलाच नाही पाऊस अजून
कुठून देऊ तुला पाणी
याला जबाबदार माणूस प्राणी!
उत्तर ऐकून विहिरीचे चिमणी निराश झाली पण हरली नाही. ती पुन्हा उडाली अन् गेली तळ्याकडे आणि म्हणाली…
तळ्या तळ्या पाणी दे
मदतीचा हात दे
दोन थेंब पाणी घेईन
मुलाबाळांची तहान भागवीन!
मग तळे म्हणाले…
मी तर गेलो किती सुकून
आलाच नाही पाऊस अजून
कुठून देऊ तुला पाणी
याला जबाबदार माणूस प्राणी!
उत्तर ऐकून चिमणी निराश झाली पण हरली नाही. ती एका झाडावर जाऊन बसली आणि विचार करू लागली. इथे प्रत्येक जण म्हणतोय माणूस प्राणी जबाबदार! मग चिमणी निघाली माणूस प्राण्यांच्या शोधात!

चिमणी गेली एका गावात. तिथं काही माणसं काम करत होती. कोण झाडं तोडत होती. कोण लाकडे फोडत होती. कोण लाकडाची खुर्ची बनवत होतं, तर कोण लाकडाचं देवघर! तिथं लाकडाचा नुसता खच पडला होता. मग चिमणी एका माणसाजवळ गेली अन् म्हणाली,
माणसा माणसा पाणी दे
मदतीचा हात दे
दोन थेंब पाणी घेईन
मुलाबाळांची तहान भागवीन!
चिमणीचे बोल ऐकून माणूस प्राणी म्हणाला,
हे बघ चिमणे जरा ऐक
दिवसभरात येतो टँकर एक
मलाच पुुरत नाही पाणी
तुला कसा देऊ काही!
आता मात्र चिमणीला राग आला. ती रागातच म्हणाली,
सारे पाणी एकट्यानेच संंपवलेस?
विहिरी, नद्या, तलाव आटवलेस?
तूच केलास जंगलांचा संहार
सगळे म्हणतात तूच जबाबदार!
माणूस म्हणाला, मी काय केले? पाऊस नाही पडला त्याला मी काय करणार? तशी चिमणी रागानेच म्हणाली…
माणसा माणसा तू तर हावरा
बिन शेपटीच्या लबाड वानरा
जंगल संपवलेस,
प्राणी मारलेस
आणि आता तोंड फिरवलेस!
लक्षात ठेव माणसा आमच्यासारखा तूही करशील पाण्यासाठी वणवण. मगच समजेल माझे म्हणणे! नंतर थोड्याच दिवसात चिमणीचे बोल खरे ठरले. अन् पाण्यासाठी माणसांचे जागोजागी दंगे सुरू झाले!

मग तो माणूस चिमणीच्या शोधात निघाला. चिमणी दिसताच तो म्हणाला, चिमणीताई माफ कर मला. तेव्हा चिमणी म्हणाली, अरे माफी काय मागतोस! झाडं लाव झाडं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -