- निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
कुटुंबातील कलहापासून ते विश्व महायुद्धापर्यंत ही सर्व युद्ध का होतात? वादविवाद, भांडण, नकारात्मक ऊर्जा, युद्ध हे शब्द ऐकले तरीही नकोसे वाटतात, तरीही हे सर्व सजीवसृष्टीत होतेच. नक्की कारण काय असावं बरं? सर्वच राष्ट्र एकमेकांशी शीतयुद्ध, आतंकवादी युद्ध, परमाणू बॉम्ब युद्ध अशी युद्ध करतच आहेत. कशासाठी? राष्ट्रहितासाठी? अगदी आदी मानवापासून ते तिसरं महाविश्वयुद्ध इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. तसं तर भारत प्रथम आणि द्वितीय महाविश्वयुद्धात सामील होता. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये युद्धासंबंधित काय म्हटले आहे आपण पाहुया. यजुर्वेदामध्ये ‘युद्ध संहिता’ म्हणून वर्णन आहे. यात वेदातील ग्रंथांमध्ये सर्व विद्यांचे वर्णन आहे. वेदकाळात युद्ध कला ही खूप सशक्त होती. खरं तर युद्ध आणि योद्धाद्वारे राष्ट्रसंरक्षण हे महत्त्वाचे आहे. युद्ध कलेमध्ये इंद्राला सर्वात मोठे स्थान आहे. इंद्राला युद्धाचे दैवत मानले जाते. इंद्र दुष्टांचा वध करणारा विनाशक म्हणून त्याला ‘वृत्रहन’ असे म्हणतात आणि म्हणूनच सर्व विश्वाचा शासक म्हणून इंद्राचे वर्णन आहे. ऋग्वेदामध्ये देवांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, त्यांचा विनाशक हे इंद्रास म्हटले. दुर्गुणाचे विनाशक म्हणूनच त्यांचे वर्णन आहे.
आपल्या पुराणग्रंथांमधील युद्ध वर्णनामध्ये दुर्गुणांशी, चुकीच्या विचारांशी युद्ध झालेली आहेत. निरपराधांना त्रास देणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे, चोऱ्या करणे, वाईट बोलणे या अशा अनेक दुर्गुणांची शिक्षा ही या दुर्गुणरूपी व्यक्तींना दिली गेलेली आहे. परिणामी त्याला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. ऋग्वेदामध्ये अनेक कथांचे वर्णन केले आहे. देवांना त्रास देणाऱ्या राक्षसांबरोबर युद्ध करावे लागेल, असे वर्णित आहे. मग हे राक्षस कोण?
अथर्ववेदामध्ये युद्ध कलेचे अनेक नियम आहेत. जे आधुनिक कलेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. आश्चर्य या गोष्टीचे आहे की, आधुनिक कोणतीही कला असो मग ती युद्ध कला असो किंवा जगण्याची असो ही आपल्या वेदकालीन अतिशय उत्कृष्ट आणि अवर्णनीय सूक्ष्म अवलोकनाने, निपुण पद्धतीने केली गेलेली आहे. सर्वांचा शेवट ‘राष्ट्रहित’ हाच आहे. राष्ट्रहित म्हणजे काय तर समाजाचे संरक्षण. फक्त दुर्गुणांचा सर्वनाश एवढेच आहे. वेदांमध्ये राष्ट्रशक्तीला क्षीण करणाऱ्यांना अतिशय तुच्छ किड्यांची उपमा देण्यात आलेली आहे. ज्याला तिथल्या तिथेच चिरडून टाकावे, असे संकेत आहेत. आंतरिक गुप्तचर हे राष्ट्रहितासाठी दुर्दैवी आहेत. त्यांचा सर्वनाश हा करावाच लागेल, असेही वेदांमध्ये सांगितले गेले. योद्धा एवढा बलशाली आणि शक्तिवर्धक पाहिजे की त्याच्या एका घावात शत्रूचा नाश झालाच पाहिजे. अथर्ववेदामध्ये आपल्यावर मागून वार करणाऱ्या शत्रूंना जिथे लपले असतील, तिथून शोधून वेळीच मारले पाहिजे आणि हे कार्य गुप्तचरांचे आहे. युद्ध हे राष्ट्रहितासाठीच आणि राष्ट्राला सुदृढ बनविण्यासाठीच आहे. खोटेपणाने युद्ध करणाऱ्याला सुद्धा शिक्षा दिली गेली आहे. युद्धामध्ये मानसिक आणि शारीरिक बळ देण्यासाठी अनेक क्लृप्त्या दिलेल्या आहेत. शत्रूवरील विजयप्राप्तीसाठी असणारे, संवेदनात्मक, शत्रू कमकुवत व्हावा म्हणून ‘संमोहन’ अशा अनेक उपचारात्मक नियमावली आहेत. वेदकाळात शक्ती, अंकुश, मरुत, वाशी, परशू, विषारी बाण, स्वध्विती तलवार, पाश अशा अनेक शस्त्रांचे वर्णन ऋग्वेदात आहे. कौटुंबिक हित आणि राष्ट्रहित याच्या शांतीसाठी असणारे सर्व उपाय या अथर्ववेदात आहेत. सर्वांची शांती भंग करणाऱ्या शत्रूला असणाऱ्या शिक्षा सुद्धा अथर्ववेदात आहेत.
सर्व निरीक्षणाअंतर्गत आपल्याला समजते की, वेदांमध्ये शेवट हा शांतीने आणि सुखमयरीतीने केला गेला आहे. कारण जर आपल्याला राष्ट्राला, आपल्या समाजाला सुदृढ करायचे असेल, तर अविचारी प्रवृत्तींपासून दूर ठेवावेच लागेल आणि या अविचारी प्रवृत्तीचा वेळीच नाश करावा लागेल. मी बऱ्याचदा पाहिले पशू-पक्षी हे सर्व जेव्हा कळपाने झुंडीत एकमेकांवर हल्ला करतात म्हणजे तशा तर या गोष्टी फार क्वचितच घडतात आणि समजा घडल्या तर या काही वेळे पुरत्याच मर्यादित असतात; परंतु मानवाने आजपर्यंत या जगामध्ये अगणित युद्ध केली आहेत. याचे पडसाद म्हणजे सर्वनाश आणि अंत कुणास ठाऊक हा सर्वनाश कित्येक वेळा झाला आहे आणि तरीही अजूनही कोणाचेही डोळे उघडले गेले नाहीत. मुख्य म्हणजे याला कुठेही युद्धविराम लागलेला नाही. विश्व विनाशाचे मूळ कारण हा मानवच आहे. रामायण, महाभारत यातील वर्णनानुसार युद्धाचा अंत हा सर्व नामशेषातच झालेला आहे, तरीही पुनर्निर्मिती होतच आहे. जर श्रीकृष्णाची द्वारका डुबली, श्रीरामांना वनवासात जावे लागले, तर आपण सर्वसामान्य व्यक्ती ते काय? शत्रुत्व, वादविवाद, भांडण, युद्ध याचे परिणाम काय होतात? याचा अर्थ काय असतो? याचे हे मोठे उदाहरण; परंतु या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही. युद्धामुळे शहर, अर्थव्यवस्था सर्वच ढासळते. मग राष्ट्रहित कसे?
विश्वविद्यालय तक्षशीलेवर जेव्हा हुणांनी आक्रमण केले, तेव्हा सहा महिने तक्षशीला जळत होती. आतापर्यंत कित्येक मंदिरांचा विध्वंस झाला. गाव, शहर, राज्य उद्ध्वस्त, नामशेष झालेत. नागासाकी, हिरोशिमा काय किंबहुना सर्वच युद्धामध्ये मनुष्यहानी झालेली दिसली. पण कधीतरी पंचतत्त्व असंतुलन आणि मानव सोडून बाकीच्या सजीव सृष्टीवर झालेल्या परिणामाचा कुठेतरी उल्लेख किंवा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नाही. या युद्धांमुळे कैक वर्षे हिरोशिमा, नागासाकी येथे असलेल्या मानवाला कॅन्सर आणि अनेक आजारांनी ग्रस्त केले. जर मानव या आजाराने ग्रस्त होऊ शकतो, तर तेथे असणाऱ्या इतर सजीवसृष्टीवर काय परिणाम झाले असतील, त्यांना पण किती आजार झाले असतील, किती तरी पशू-पक्षी, कीटक वनस्पती नामशेष सुद्धा झाले असतील म्हणजेच ते त्या भूमीवर परत जन्म घेण्यास त्या भूमीची क्षमता तरी राहिली असेल का? मग याला जबाबदार कोण? युद्ध केल्यामुळे काय साध्य झाले, हा एक खूप मोठा प्रश्न आहे.
आतापर्यंत आपण निसर्ग नियमाविरुद्ध जाऊन अनेक शोध लावले. निसर्गाला आपल्या बाजूने वळण्यास भाग पाडले. उद्या निसर्ग आपल्याला एवढे शोध लावायला लावेल की, तो आपल्या जगण्यासाठी आपल्याला अजून शोध लावायला भाग पाडेल. कारण निसर्ग प्रक्रिया सतत बदलत राहणार. कृत्रिम सूर्य, चंद्र, तारे, ऋतू निर्मिती आपल्याला ही करावी लागली, तर मग काय होईल? निसर्गाची संरचना आपण मुळातच बिघडवत चाललो आहोत आणि मग ही कृत्रिम संरचना आपल्याला घातकच होणार. कारण परमेश्वराने केलेली या पृथ्वीची संरक्षण संरचना ही अद्भुत शक्तीने केली आहे आणि मानव त्याच्यासमोर शून्यच आहे. मानव जो काही निसर्गाचा विध्वंस करीत आहे, पर्यावरण संतुलन बिघडवत आहे. त्यातीलच हे एक युद्ध. मानवी युद्धानंतर त्याचे परिणाम पंचतत्त्वावर काय होतात, याचा विचार जरी मनात आला, तरी एक विचित्र भीती निर्माण होते. या युद्धांमुळे पंचतत्त्व असंतुलन झाल्यामुळे भूकंप, दुष्काळ, महापूर, प्रदूषण या सर्वांचे पडसाद म्हणजे मानसिक आणि शारीरिक असंतुलन हे सर्व सजीव सृष्टीला भोगावेच लागतील. साहजिकच मग एक दिवस परत या भूमातेचा हा स्वर्ग नष्ट होणार.
युद्धाचं मूळ कारण राग, द्वेष, मोहमाया = दुर्गुणग्रहण = मानसिक असंतुलन = कलह, युद्ध = निसर्ग आणि सजीवसृष्टी अंत. हे आपल्या जगण्याचे गणितच मानवाला समजलेच नाही. आत्मा+कर्म=जीवन. म्हणजेच आत्मा आणि कर्म एवढेच सत्य आहे. ते जाणून या विश्वात आपण मानव जन्म घेतल्याचे कारण समजून त्यानुसार आपले कर्म करणे आणि आपले जीवन व्यतीत करणे हे नक्कीच आपल्याला समजून आत्मसात करायला पाहिजे.
(क्रमश:)
[email protected]