Monday, March 17, 2025

परमछाया…

माेरपीस: पूजा काळे

अश्मयुगीन किंवा त्याहीपेक्षा अतिप्राचीन काळापासून मनुष्य जन्माचं कोडं अघटित, अचंबित करणारं आहे. शेपूट असणाऱ्या पायापासून ते पुढे दोन हातपाय या आमूलाग्र बदलामधला मनुष्य जन्माचा काळ, जीवनमान खडतर तरीही, सुसह्य होतं यात काडीमात्र शंका नाही. एकट्यानं जीवन जगणारा मानव पुढं कळपात राहू लागला. कंदमुळं, फलाहार, शाकाहार आणि मांसाहार भक्षण करताना, ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींपासून आपलं रक्षण कसं होईल या दृष्टीनं विचार करू लागला. जंगल वासातल्या त्याच्या धडपडीला पूर्णतः प्राप्त झालं ते पृथ्वी, आप, वायू, जल या शक्तीला आमंत्रित केलं गेलं तेव्हा तारणहार, अतुलनीय, अज्ञात, अचंबित शक्ती आपल्या आसपास असल्याचं त्याला जाणवलं होतं. त्या शक्तीचं प्राबल्य जाणूनचं पुढच्या काळात अदृश्य शक्तीतील ईशाला आपल्या प्रबळ इच्छा पूर्ततेसाठी आवाहन केलं गेलं. या गोष्टी अलौकिक होत्या. तद्वत: निसर्गात अशा चमत्कारिक अद्वितीय शक्ती असल्याचा दावा काही तज्ज्ञ जाणकारांनी या आधी केला होता. हे शाश्वत सत्य आहे की, अदृश्य शक्तीतील परमेश्वर आपण पाहू तसा दिसतो.

पंचतत्त्वातील त्याचं असणं, आपल्या जीवनचक्राला गती देणं यातून सहज लक्षात येतं. मनुष्य जन्माचा इतिहास उलगडताना मनुष्य योनीतला जन्म भाग्यवंतानाच प्राप्त होतो. ही सत्यता पटवताना संतांची वचने मनुष्य धर्माचे, कर्तव्याचे, जन्माचे सार सांगतात. जन्म एकदा मिळतो, त्यायोगे मनुष्य कुळात जन्मलेल्या मानवाचा उत्कर्ष हा त्याच्या समतावादी विचारात दडलेला असतो हे उघडचं आहे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे! अशा या समतावादी विचारसरणीत अदृश्य शक्तीमधला परमेश्वर आढळतो. पंचतत्त्वात अदृश्य शक्ती वावरतात. हा भ्रम किंवा आभास नाहीय, तर या शक्ती आपल्या हळव्या, भाऊक मनाशी जोडल्या गेलेल्या असतात.

चराचरातील शक्ती मानवी मेंदूपासून शरीरांतर्गत अवयव, मनावरही ताबा मिळवते. त्याच्यापुढं नतमस्तक होतो आपण. जमीन पर्वत मोठे असतात. त्याहून मोठा असतो समुद्र. पण समुद्रातून मोठे असते ते आभाळ. पंचभुतातली आभाळभर माया सर्वत्र आपले पाश रोवते. समुद्राची गाज, अथांगता काजळ तीट लावते. हिरवाईने निसर्ग नटतो. श्वासाला कारणीभूत ठरणारा वारा वेगेवेगे उनाड धावत निसर्ग चक्राला गती देतो. अशा या किमयागार अद्भुत शक्तींचे पांग मानव जन्मोजन्मी फेडू शकणार नाही. निदान त्याच्या प्रती आपले समर्पण हीच त्याला वंदना ठरेल.  दुसरी महत्त्वाची वचन पूर्तीतली शक्ती म्हणजे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा…! “ सर्वधर्मपंथ अनुयायातील संत, माहात्म्यांना देव माणसात दिसतो.

माणसामधला देव ओळखता आला पाहिजे. गरजा नसणे वा कमी असणे ही ईश्वरी प्रेरणा मानल्यास, स्वकर्म ही ईश्वरी पूजा असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रामाणिक माणसं ही ईश्वराची सर्वोत्तम कृती आहे, असं देखील म्हणता येईल. मनुष्याच्या गुणदोष, स्वरूपाची वैयक्तिक पातळी वेगळी असली तरी, समजण्याची कला, सामंजस्य, कौशल्य, मौलिक सल्ला, प्रेम, सांत्वन या आणि बऱ्याच गोष्टी माणसातल्या अदृश्य शक्तीचा परमेश्वरी साक्षात्कार घडवतील. अनेक गोष्टीवर प्रेम करताना; चिंतनाने अंतर्मनात दडलेल्या परमेश्वराला जाणलं तर मनुष्य योनीतल्या ईश्वरास जाणून घेतल्याचे सार्थकी लागेल. यासाठी देह, मन, बुद्धी, वेळ या अत्युच्यम देणगीचा सदुपयोग निश्चित बळ देणारा ठरेल.

याप्रसंगी आपल्यातील तत्त्व ओळखून शब्द  अर्था आधी यावा, हे तो ईश्वराचे देणे. बा. भ. बोरकरांच्या या पंक्ती बरंच काही शिकवून जातात. तेव्हा सत्यम-शिवम-सुंदरम अशा विचारधारणेने भारलेल्या देवत्वाचे आपण पायिक असू. जाणीवपूर्वक चांगल्या विचारांचं जाळं आपल्या अवतीभोवती विणलं जात असेल, तर अदृश्य शक्तीचा सकारात्मक परिणाम मनावर गडद छाया घेऊन वावरणाऱ्यांना ज्ञानाचा प्रकाश देईल. शेवटी पंचमहाभुतात जन्मलेलो आपण या अवताराचे देदीप्यमान अंश आहोत. आसपासच्या अदृश्य शक्ती चांगल्या माणसाकडून आलेल्या असो वा पंचतत्त्वाकडून वा परमेश्वरी चिंतनातून लाभलेल्या असो, मनन-चिंतनातला आनंद मानवाला सदृश्य अशा महा शक्तिरूपी परमेश्वरापर्यंत नेऊन सोडतो हेच खरंय. ईशप्राप्तीचा मार्ग अंतःकरणापासून निघून अनादी, अनंत साक्षात्कारापर्यंत पोहोचतो.

एकविसाव्या शतकातली आपली वाटचाल म्हणजे, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले म्हणत, सृजनाचा स्वीकार करावयास सादर हीच असावी. खरं तर मानवाला सदैव भौतिक सुखांना तारून धरणाऱ्या ईश्वर कृपा कवचाची गरज भासत आलीय. तेव्हा जोवर मनुष्य या धरतीवर असेल तोवर पुण्यकृपेनं अदृश्य शक्ती, परम ईश्वरीकृपा मानवाची छाया बनून राहतील. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती आणि हेच अंतिम सत्य जगाच्या अस्तापर्यंत राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -