- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी होती. अनेक पिढ्यांना आजही हळवे करणारे ‘वो जब याद आये, बहुत याद आये’, ‘लतादीदींच्या कोवळ्या आवाजातले जबरदस्त वेग असलेले ‘मेरे दिलमे हलकीसी, वो खलीश हैं, जो नहीं थी’, ‘उई मां उई मां ये क्या हो गया, उनकी गलीमे दिल खो गया’, रफीसाहेबांच्या आवाजातले ‘रोशन तुम्हीसे दुनिया’ ही अजरामर गाणी गीतकार असद भोपाली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ‘पारसमणी’तून रसिकांना दिली.
परीकथेसारखे कथानक असलेला, चमत्कारांनी भरलेल्या पारसमणीचा अर्धा भाग कृष्णधवल, तर उरलेला इस्टमन कलर होता. रसिकांना आवडल्याने सिनेमा आर्थिकदृष्ट्याही यशस्वी ठरला. पुढच्याच वर्षी तो डबिंगच्या माध्यमातून ‘मायामणी’ या नावाने तमिळमध्ये गेला.
प्रमुख भूमिकेच होते-महिपाल (पारस), गीतांजली (राजकुमारी), नलिनी चोणकर (पारसची बहीण ‘रूपा’), मारुती राव (पारसचा भाऊ ‘टिपू’), अरुणा इराणी (बिजली) आणि हेलन.
पारस हा एका सेनापतीचा मुलगा, जहाज वादळात सापडल्याने, तो एका अज्ञात बेटावर अडकतो. तेथील गरीब माणूस त्याचे पालनपोषण करतो. तरुणपणी तो एक कुशल तलवारबाज योद्धा आणि उत्तम गायकही होतो. त्याच्या गायनकौशल्याची कीर्ती राजापर्यंत पोहोचते.
राजा त्याच्या गाण्याचा कार्यक्रम राजवाड्यात ठेवतो. गाणे ऐकून खूश झाल्यावर राजा त्याला ‘हवे ते मागायला’ सांगतो. दरम्यान नायक आधीच राजकन्येच्या प्रेमात पडलेला आहे. तो तिच्याशी लग्नाची इच्छा प्रांजळपणे सांगून टाकतो. राजा संतापतो.
मात्र इथे कथेतील फँटेसीचा भाग सुरू होतो. राजाला एक शाप आहे. जेव्हा राजकन्येचा विवाह होईल, तेव्हा त्याला मृत्यू येणार असतो, त्यावर उपाय म्हणजे पारसमणीचे दर्शन! जर अत्यंत अमूल्य आणि अप्राप्य असलेले पारसमणी हे रत्न राजाला मिळाले, तर तो वाचणार असतो. मग राजा ‘ते रत्न आणून दे, तर तुझे लग्न राजकन्येशी लावून देईन’ असे आश्वासन देऊन, नायकाची बोळवण करतो. पारस ते आव्हान स्वीकारतो. पुढे अनेक संकटांना तोंड देत, त्याने मिळवलेल्या यशाची कथा म्हणजे हा सिनेमा.
जिथे पारसमणी शोधायला जातो, तिथली चेटकीणही त्याच्या प्रेमात पडते. तिचे वय असते २०० वर्षे. मात्र पारसमण्याच्या सहाय्याने ती चिरतरुण राहत असते. ती पारसला वश करण्याचा प्रयत्न करत असते. त्याला घेऊन ती सिंहासनावर बसलेली असताना, मनोरंजन करण्यासाठी दोन नर्तिका राजवाड्यात नृत्य करतात, असा एक प्रसंग आहे.
असद भोपाली यांचे याप्रसंगीचे गाणे म्हणजे लक्ष्मी प्यारेंचा कहर होता. इतका जबरदस्त ठेका आणि कर्णमधुर संगीत त्यांनी गाण्याला दिले की, त्या वर्षीच्या बिनाका गीतमालाच्या नामांकनात ते सातव्या क्रमांकावर वाजले. पहिल्या क्रमांकावर होते, ‘ताजमहाल’मधले साहीरचे लता आणि रफीसाहेबांनी गायलेले आणि रोशनचे संगीत असलेले ‘जो वादा किया वो निभाना पडेगा.’
भोपालीसाहेबांच्या गाण्याचे शब्द होते –
‘ हँसता हुआ नूरानी चेहरा,
काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा.
तेरी जवानी तौबा रे तौबा रे,
दिलरुबा दिलरुबा,
दिलरुबा दिलरुबा.’
माणूस प्रेमात पडतो, तेव्हा भारल्यासारखा झालेला असतो. ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो आहे, तिचाच विचार सतत सुरू असतो. तोच चेहरा डोळ्यांसमोर सतत तरळत असतो. आधीच ती व्यक्ती मनाला अतिप्रिय होऊन बसलेली, त्यात तिचा सुहास्य चेहरा, दाट चमकता केशसंभार, गोऱ्या चेहऱ्यावरची सोनेरी छटा आणि वर तारुण्याचा बहर. मग काय होणार? प्रेमिक किंवा प्रेयसी अजूनच घायाळच होणार ना!
गाण्यात लतादीदी आणि कमल बारोटमध्ये जणू जुगलबंदी सुरू होती. दीदीचा मंजुळ स्वर आणि कमल बारोट यांचा नाजूक अनुनासिक आवाज यांच्या मिश्रणाने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वेगळीच मजा आणली होती. त्यात गाण्याचा तो जबरदस्त ठेका! सगळेच कहर करणारे.
गाण्यात प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीच्या मन:स्थितीचे सुंदर वर्णन आहे. ‘तिच्या’ किंवा ‘त्याच्या’ मनात काही असो की नसो, इकडच्या व्यक्तीला वाटत असते, पहिल्या नजरभेटीतच आपण लुटले गेलो आहोत. पण त्यानंतर मात्र ‘तिने’/ ‘त्याने’ किती ऐटीत वागणे सुरू केले! तिला काय कल्पना येणार माझ्या मनस्थितीची! मनाच्या बैचेनीची! मग ती तक्रार करतीये-
‘पहले तेरी आँखोंने लूट लिया दूरसे,
फिर ये सितम हमपे कि देखना गरूरसे,
ओ दीवाने, ओ दीवाने,
तू क्या जाने, तू क्या जाने
दिलकी बेकरारियाँ हैं क्या!’
हँसता हुआ नूरानी…
यानंतरचे कडवे आगळे आहे. प्रेमाची प्रांजळ कबुली दिल्यावर सहसा प्रियकराची किंवा प्रेयसीची पहिली मागणी असते, ती आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा ही! पण असदजी इथेही कशी मजा आणतात पाहा. त्यांच्या रचनेत एक जुनून, प्रेमाचा उन्माद आहे. एक कैफ आहे, कलंदरपणा आहे.
ते म्हणतात, ‘मला तुझ्या प्रेमात पडल्यावर जो त्रास होतो आहे, त्याचा अजिबात विचार करू नकोस. तू मला मनसोक्त छळून घे, तळमळायला लाव, माझ्या मनावर घाव कर. सगळे चालेल. तुझे सगळे जुलूम मला स्वीकारार्ह आहेत! पण त्या बदल्यात अगदी थोडे तरी प्रेमही कर!
‘जी भरके तड़पाले जी भरके प्यार कर,
सब कुछ गंवारा है थोड़ासा प्यार कर.
तू ही दिलमें, तू ही दिलमें,
दिल मुश्किलमें, दिल मुश्किलमें.
अब न दिलकी मुश्किलें बढ़ा!
हँसता हुआ नूरानी…’
असे कुणी नजरबंदी करून, जेव्हा मनात उतरते, तिथेच घर करते, तेेव्हा प्रेमीजनांचे मन अस्वस्थ असते. एका पातळीवर त्याला ती अस्वस्थता आवडतही असते आणि वेदनादायीही ठरत असते. शेवटी एका क्षणी धीर सुटतो आणि प्रेमिक मग याचना करतो, ‘तूच मला यातून सोडव. तू मनाचा कोपरा न कोपरा व्यापल्याने आणि अजून तुझ्याकडून काहीच प्रतिसाद नसल्याने मन बैचेन झाले आहे. त्याची अस्वस्थता अजून वाढवू नकोस.’ शायर जां निसार अख्तर यांनी १९५६च्या ‘छु मंतर’मध्ये जॉनी वॉकरच्या तोंडी दिलेल्या गाण्यासारखी ही विनंती आहे-‘तुम्हीने दर्द दिया हैं, तुम्ही दवा देना.’ ज्या काळी प्रेम शरीर नव्हते, त्याचा संबंध केवळ शृंगाराशी जोडलेला नव्हता. तो मनाच्या मनोहारी खेळांशी होता. भावनेच्या उत्कटतेशी, कधी तिच्या उन्मुक्त धीट अभिव्यक्तीशी, तर कधी भावनेला मनाच्या थडग्यात कायमचे पुरून टाकण्याच्या सहनशील तयारीशी होता. भावनेच्या उत्सवाचे ते रंगीबेरंगी दिवस! आठवावेत, त्यात रमावे, त्यासाठीच तर ही गाणी!