Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीमहापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातील कर्तव्यक्षमता, सचोटीची उदाहरणे अनेक अधिकारी, कर्मचारी, कामगारांच्या माध्यमातून नेहमीच जनतेसमोर येतात. कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे असेच एक उदाहरण डी विभागातील स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रुपाने समोर आले आहे. महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ रस्ता साफ करीत असताना आढळलेले अंदाजे १५ तोळे सोने पोलिसांकडे सुपूर्द करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखविला. पालिका कर्मचा-याचा हा प्रामाणिकपणा पाहून मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कुंभार यांचा सत्कार केला आणि सफाई कामगारांच्या जीवनावर आधारीत असलेल्या नाटकाची दोन तिकिटेही भेट दिली.

भल्या पहाटेपासून मुंबईचा कोपरान् कोपरा स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी दररोज आपल्या नजरेस पडतात. न थांबता, न थकता हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी घाम गाळतात. पालिकेच्या डी विभागामध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत कार्यरत सुनील कुंभार रविवारी, १२ मे २०२४ रोजी महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना अंदाजे १५ तोळे सोने (एक सोन्याचे बिस्कीट दहा तोळे), एक सोन्याची वळी पाच तोळे) आढळून आले. त्यासोबत मूळ मालकाचा कोणताही पुरावा नसल्याचे पाहून कुंभार यांनी मुकादम बाळाराम जाधव यांच्याकडे हे सोने सुपूर्द केले. त्यानंतर, त्यांनी नजीकच्या दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीच्या मालकीचे १५ तोळे सोने सापडल्याची माहिती दिली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन हे सोने त्यांनी पोलीस शिपाई दीपक डावरे यांच्या ताब्यात दिले.

पालिका आयुक्त गगराणी यांना ही माहिती मिळताच त्यांनी सुनील कुंभार आणि मुकादम बाळाराम जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक तर केलेच, यासोबतच स्वच्छता कर्मचा-यांच्या जीवनावर आधारित अस्तित्त्व, या नाटकाची तिकिटे भेट दिली. तसेच संपूर्ण कुटुंबासह नाटकाला आवर्जून जा, असेही सांगितले. आयुक्त गगराणी यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने कुंभार आणि जाधव यांच्या चेह-यावर आनंद पसरला. गगराणी यांनी आपल्या दालनात त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ प्रदान करून कौतुक केले. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -